अनेक गावांत आ. शिंदे यांच्या दोन गटांत अटीतटीची निवडणूक झाली, तर काही गावांत स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय आघाड्या करून निवडणुका लढवल्या गेल्या.
माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर यापैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन यामध्ये ६२ ग्रामपंचायती आ. शिंदे समर्थकांनी काबीज केल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा त्यांचा माढा तालुक्यातील राजकीय दबदबा कायम राहिला आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे पंचवीस ग्रामपंचायतींमध्ये सत्तापरिवर्तन झाले. यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना मतदारांनी घरी बसवत तरुणांच्या हाती सत्ता सोपविली आहे.
सापटणे येथे माजी उपसभापती बंडूनाना ढवळे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्व ९ जागा जिंकून चाळीस-पन्नास वर्षांपासून सत्तेतील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढवळे व माजी सभापती यशोदा ढवळे यांच्या गटाचा दारुण पराभव केला, तर कोंढार भागातील टाकळी (टें) येथील शिंदे कारखान्याचे संचालक हिम्मत सोलंनकर गटाचा पराभव करून ९ पैकी ८ जागा जिंकून तानाजी सरगर यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्राम विकास आघाडीने पन्नास वर्षांपासून सत्तेत असलेल्या गटास धक्का दिला.
चौकट
माढा तालुक्यातील फुटजवळगाव, गाराअकोले, टाकळी (टें) नगोर्ली, शेवरे, माळेगाव, बेंबळे, घोटी, दगडअकोले, आहेरगाव, उजनी (व्हळे), सोलंकरवाडी ,वाकाव, उंदरगाव, कुंभेज, रिधोरे, तांदुळवाडी, बुद्रुकवाडी, भुताष्टे, उपळाई (बु.) येथे शिंदे विरोधी गट सत्तेत आलेले आहेत.
----