आप्पासाहेब पाटील
सोलापूर : रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून विविध खाद्यपदार्थांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे़ अशातच मागील दोन-चार वर्षांपासून ज्या खाद्यपदार्थाने रमजान महिनाच नव्हे संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक विक्रीचे विक्रम मोडले असे ‘बाबा का शिरखुर्मा़़़नानी के गुलगुले’ चे उत्पादन यंदाच्या वर्षी विजापूर वेस परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रीला जात असल्याची माहिती मुश्ताक बच्चेभाई यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितली.
रमजान ईदच्या निमित्ताने विजापूर वेसमधील बाजारपेठेत मुस्लीम बांधवांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे़ रमजाननिमित्ताने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी आले आहेत़ सहेरी व इफ्तार या खास कार्यक्रमासाठी मुस्लीम बांधवांबरोबरच सामाजिक संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याला ७ मे पासून सुरुवात झाली. या महिन्यात उष:कालापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास पाळले जातात. या महिन्यामध्ये रोजे असल्याने सुका मेवा, मिठाई, फळे, खजूर यांची मागणी वाढली असून शहरातील विजापूर वेस, बेगम पेठ, नई जिंदगी, शास्त्री नगर, मंगळवार पेठ, बाराईमाम चौक, ७० फूट रोड, आसरा चौक या भागांमधील विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. दररोज सायंकाळी या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे़ विजापूर वेस परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने या भागात दररोज सेलिब्रेशनचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
खजुराचे यंदाही आकर्षण वेगळेच...- रमजान महिन्यात खाद्यपदार्थात मुख्यत: वेगवेगळ्या प्रकारचे खजूर सर्वांचे आकर्षण ठरत आहेत़ यंदाही बाजारपेठेत ट्रे खजूर, डाली खजूर, अंगुरी, इराणी, बदाम, रोतब, सौदी अरेबिया, रसगुल्ला खजूर, केमिया, कॅडबरी, टोनीसीया, मेवावाला, खनिजी, इराक अशा विविध प्रकारांच्या खजुरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे़ उपवास सोडण्यासाठी मुस्लीम बांधव प्रामुख्याने खजुराचे सेवन करतात़ गुणवत्ता व आकारानुसार खजुराचे भाव ठरवले असून सर्व प्रकारच्या खजुरांना चांगली मागणी आहे.
नवाबी, अफगानी खिचडाला परराज्यातही मागणी - रमजान महिन्यात मुस्लीम बांधवासोबतच हिंदू समाजात असलेल्या विविध जातीधर्मातील लोकांकडून विविध खाद्यपदार्थांची खरेदी होत आहे़ अशातच नवाबी खिचडा व अफगानी खिचडाची क्रेझ यंदा सर्वाधिक आहे़ ६०० ग्रॅमचे पाकीट साधारणपणे ७० ते ८० रुपयास मिळत आहे़ सोलापुरात तयार होणाºया खिचडाला आंधप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यात मागणी जास्त आहे़
मुस्लीम बांधवांसाठी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठेत खिचडा, मिल्क शेक, खीर, मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विविध पदार्थांच्या किंमती स्थिर असल्यामुळे मुस्लीम बांधवांचा खरेदीचा हा उत्साह रमजान ईदपर्यंत कायम राहील़ - मुश्ताक बच्चेभाई,विजापूर वेस