सांगोला/कोल्हापूर : निवडणुका जिंकल्या की गुलाल, फटाके फोडून आनंद साजरा करणारे कमी नाहीत. पण, आपला विजय जनतेच्या हितासाठी सार्थकी लागावा यासाठी सांगोला (जि. सोलापूर) येथील शेतकरी कामगार पक्षाचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ज्या गावांमध्ये जितके मताधिक्य आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. डॉ. देशमुख यांचा हा आदर्शवत संकल्प पर्यावरणासाठी बळ देणारा ठरणार असून, इतर उमेदवारांच्या डोळ्यातही अंजन घालणारा आहे.
विशेष म्हणजे आयुष्यभर साधी राहणी जपत निष्कलंक राजकारणी कसा असावा, याचा दाखला देणाऱ्या माजी मंत्री स्व. गणपतराव देशमुख यांचे डॉ. बाबासाहेब हे नातू आहेत. पर्यावरणाला बळ देऊन आजाेबांच्या सामाजिक दातृत्वाचे एक पान नातवानेही अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पाची राज्यभर चर्चा सुरू आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. ‘काय झाडी, काय डोंगर’, या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. पेशाने कार्डिओलॉजिस्ट (एमडी) असलेल्या व पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या डॉ. देशमुख यांनी अंगावरचा गुलाल खाली उतरण्याआधीच ज्या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मताधिक्य असेल तितकी झाडे (वृक्ष) त्या गावात लावण्याचा संकल्प सोडला. त्यांचा हा संकल्प अवर्षणग्रस्त सांगोला तालुक्याला पर्यावरणदृष्ट्या समृद्ध करणारा ठरणार आहे. डॉ. देशमुख यांना शहाजीबापू यांच्यापेक्षा २५ हजार ३८६ मते अधिक मिळाली असून, त्यांच्या संकल्पनेनुसार २५ हजार वृक्षांची लागवड तालुक्यात केली जाणार आहे.
झाडी गुवाहटीला नव्हे, सांगोल्यात बघानिवडणुकीत अंगाला गुलाल लागला की, लोकप्रतिनिधी जमिनीवर येतच नाहीत. जंगी मिरवणुका, सत्कार सोहळे यातच जे जास्त रममान होतात. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मात्र या सगळ्यांना फाटा देत वृक्षलागवडीचा केलेला संकल्प राज्यभर चर्चेत आहे. सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर डॉ. देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुवाहटीच्या डोंगर, झाडांची भुरळ पडलेल्या शहाजीबापूंनी आता डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात तयार होणारी झाडी बघावी, अशाही मिश्कील प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.
राजकारण, निवडणुका या तात्पुरत्या असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधीने समाजहितालाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. निसर्गाला अधिक समृद्ध करायचे असेल, तर झाडांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणाला बळ देण्यासाठी मी तालुकाभर वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला आहे. त्याचे नियोजन सुरू झाले आहे. - डॉ. बाबासाहेब देशमुख, नूतन आमदार, सांगोला.