आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाची व्याप्ती देशभर वाढत आहे. आता सर्व समाजाला सोबत घ्या, बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) च्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. यावेळी मंचावर रिपाइं (अ) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, सुनील सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, शहराध्यक्ष राजरत्न इंगळे, सुमित वंजाळ, अल्ताफ मुल्ला, जितेंद्र बनसोडे, डॉ. विजय मोरे, ज्ञानदेव खंडागळे, दीपक चंदनशिवे, सोमनाथ भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘मी वाजवतोय समतेचा बाजा, कारण माझ्या सोबत आहे सोलापूरचा राजा’ अशी शीघ्र कविता सादर करीत रामदास आठवले म्हणाले की, दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला तेव्हा समाजावर हल्ला झाला होता. प्रतिहल्ला करण्यासाठी त्यावेळी हजारो भीमसैनिकांनी तयारी केली होती, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दगडाचे उत्तर दगडाने देऊन चालणार नाही. परिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले होते. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे. मला मंत्रिपद महत्त्वाचे नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी मी काम करतोय. सत्तेत राहिल्यानंतर समाजाची छोटी- मोठी कामे होतात. ही कामे करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी दररोज हजारो लोकांना भेटतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो. सध्या पक्ष अन्य राज्यांतही वाढत आहे, काम वाढले आहे. विविध राज्यांचे दौरे सुरू आहेत. दलित, बौद्ध, ख्रिश्चन, ओबीसी, मुस्लीम, माळी आदी समाजाला सोबत घेऊन काम करीत आहे. मराठा आघाडीचीही स्थापना केली असून पदाधिकाºयांच्या निवडीही झाल्या आहेत. खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष निर्माण करीत आहोत. पक्षाला व्यापक स्वरूप द्यायचे आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) मजबूत करू, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले. ------------------------माझ्यानंतर मान राजाचा...रिपाइं (अ) च्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ सर्वव्यापी करीत आहे. राज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना घेत असतो. राजकीय वाटचालीत माझ्यानंतरचा मान मी राजा सरवदे यांनाच देणार आहे, असे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. -------------------------पक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदे- २0१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत अन्य पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घ्यायची नाही असे सांगितले असताना देखील काही लोकांनी मनाचा कारभार केला. पक्षाचा आदेश डावलून स्वार्थी कार्यकर्ते भाजपात गेले, त्यामुळे मी सोलापूरसह महाराष्ट्रातील ३२ जणांना पक्षातून काढून टाकले. भीमा- कोरेगाव येथील हल्ला हा नियोजित होता, त्या भागातील वडू, शिखरापूर, सणसवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. रिपब्लिकन ऐक्य व्हावे पण ते कायमस्वरूपी टिकावे अशी आपली भूमिका आहे. आगामी निवडणुकीसाठी बुथवाईज आपण आपले कार्यकर्ते मजबूत करा. कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे काम केले पाहिजे. दि.१६ मार्च २०१८ रोजी तालकटोरा, दिल्ली येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे, असे यावेळी प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी सांगितले.
बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, रामदास आठवले यांचे आवाहन, सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:39 AM
पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ठळक मुद्दे सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे : रामदास आठवलेपक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदेराज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना : रामदास आठवले