आप्पासाहेब पाटील
सोलापूर : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक...या चौकात असलेला डॉ़ बाबासाहेबांचा पुतळा...महाराष्ट्र व कर्नाटकाच्या कानाकोपºयातून आणलेली ७०० किलो फुले...१२ फुलारी...२४ तास फुलं ओवण्याचे चाललेले काम...याच कामातून तयार करण्यात आलेले रंगीबेरंगी फुलांचे हार अन् याच हारातून बाबासाहेबांच्या पुतळ्याला करण्यात आलेल्या सजावटीमुळे आंबेडकर चौकात फुलांचा सुगंधच सुगंध दरवळत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आला.
महापरिनिर्वाण दिनाला १ डिसेंबर ते ७ डिसेंबर यादरम्यान मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून २५ लाखांहून अधिक भीम अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यात सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हजारो भीमसैनिकांचा समावेश आहे़ सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसरात जमतात़ गुरुवारी रात्रीपासूनच पुतळा परिसरात भीमसैनिकांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती़ महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटकातून आणली लाल, पिवळी अन् पांढरी शेवंती...- डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सजविण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातील कानाकोपºयातून फुले आणली़ यात लाल, पिवळी व पांढरी शेवंती यांचा समावेश होता़ एकूणच सजावटीसाठी ७०० किलो फुले लागली़ यासाठी दिवसरात्र १२ फुलारी काम करीत होते़ गुरूवारी सकाळी ११ वाजता सजावटीस सुरुवात करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती सुरूच होती़ महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला करण्यात आलेल्या सजावटीमुळे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर शहरवासीयांचे आकर्षण ठरत आहे़
उद्यान व झोन विभागाकडून तयारी पूर्ण- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संपूर्णपणे तयारी करण्यात आली आहे़ पुतळा परिसर सजावट, मंडप उभारणी, बगिचा फुलविणे, विद्युत रोषणाई आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ तयारी पूर्ण केल्यामुळे पुतळा परिसर खुलून गेला आहे़ सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेईल, अशी सजावट करण्यात आल्याची माहिती उद्यान प्रमुखांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला सजावट करण्यात आली़ यासाठी कर्नाटकातून फुले आणली़ लाल, पिवळी व पांढरी शेवंती ही फुले जास्त प्रमाणात वापरण्यात आली आहेत़ लहान-मोठ्या हारातून सजावट करण्यात आली आहे़ पुतळा परिसर खुलून दिसावा व सर्वांचे आकर्षण ठरावे याच हेतूने सजावट केली़- जमीर शेख, फूलविक्रेता, सोलापूऱ
आम्ही १२ कर्मचाºयांनी मिळून या सजावटीसाठी हार बनविले आहेत़ बुधवारी दिवसभर व रात्रभर फुले ओवण्याचे काम सुरू होते़ गुरुवारी सकाळी अकरा वाजता सजावटीस सुरुवात झाली़ डॉ़ आंबेडकर पुतळा परिसरात कोपरान् कोपरा सजावटीने फुलून गेला आहे़ यंदा सजावटीसाठी आणण्यात आलेली काही फुले कर्नाटकातून आणली आहेत़- बशीर चौधरी, फूलविक्रेता, सोलापूर
यांनी सजविला पुतळा परिसर- भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर मोठ्या प्रमाणात सजविण्यात आला आहे़ यासाठी टिळक चौकातील सहेली फ्लॉवर सेंटरच्या फुलारींनी काम केले़ यात जमीर शेख, बशीर चौधरी, हमीद अरयावाले, आरिफ नदाफ, मन्सूर सौदागर, मुजीब शेख, रेहान शेख यांनी गुरूवारी दिवसभर पुतळा सजावटीचे काम केले़ सकाळी ११ वाजता सुरू झालेली सजावट सायंकाळी पाच वाजता संपली़