आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जेव्हा एखादी महिला आपल्या लहान मुलासोबत ट्रेनमध्ये एकटी प्रवास करते तेव्हा तिला लोअर बर्थ देण्याचा नियम आहे; पण मुलं सीटवरून पडण्याची भीतीही असते. यासाठी आता भारतीय रेल्वेने प्रत्येक गाडीत एक अनोखी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांना त्यांच्या आईसोबत आरामात झोपता येईल, यासाठी रेल्वेने महिलांसाठी लोअर बर्थसह 'बेबी बर्थ'चीही व्यवस्था केली आहे. या बेबी बर्थची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, लवकरच मध्य रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
भारतीय रेल्वे प्रशासन दरवर्षी प्रवाशांसाठी सेवासुविधांसाठी विविध प्रयत्न करते. शिवाय प्रत्येक प्रवाशांचा जलद, सोयीस्कर प्रवास व्हावा यासाठी विशेष परिश्रम घेते. नव्याने निर्माण होत असलेल्या या बेबी बर्थसह सीट बुक करण्यासाठी रेल्वेकडून कोणतीही वेगळी प्रक्रिया आत्तापर्यंत ठेवण्यात आलेली नाही. सध्या ते फक्त चाचणीसाठी एका बोगीत बसवण्यात आले आहे. भविष्यात रेल्वे याबाबत मोठा निर्णय घेऊन सर्वच रेल्वेत ही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
--------
यामुळे सुरू केली सुविधा...
ट्रेनच्या आरक्षित बर्थची रुंदी कमी आहे. त्यामुळे महिलांना लहान मुलांसह प्रवास करणे कठीण जाते. विशेषतः रात्रीच्या प्रवासात झोपेची समस्या सर्वात जास्त असते. त्यामुळे महिलांसाठी आरक्षित लोअर बर्थसह बेबी बर्थची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या बेबी बर्थमध्ये बाळ बर्थवरून खाली पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
----------
असे आहे बेबी बर्थ...
मुलांच्या सोयीसाठी बेबी बर्थमध्ये स्टॉपर बसवण्यात आला आहे. यात वरच्या बाजूला एक लहान हँडल आहे आणि बाजूला रॉडदेखील आहे, जेणेकरून बाळ झोपताना सुरक्षित राहते. दोन्ही बाजूला उशा ठेवून बाळाला झोपायला लावता येते. हे मुख्य बर्थ सीटला जोडलेले आहे आणि फोल्ड करण्यायोग्यदेखील आहे. बेबी बर्थला दोन बेल्ट लावण्यात आले आहेत. या बेल्टने बाळाला पूर्णपणे सुरक्षित करता येते. आई झोपली असलीतरी बेल्टमुळे मूल पडणार नाही.
----------
अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही
रेल्वेच्या या नव्या सुविधेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेबी बर्थसाठी कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. या जागेवर आरक्षण करण्यासाठी पाच वर्षांखालील मुलास फॉर्म भरावा लागेल. या आसनांवर रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू केली जाईल. आजकाल रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवनवीन पावले उचलत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे.
-------------
भारतीय रेल्वेने बेबी बर्थ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते सध्या लखनऊ-दिल्ली या विशेष ट्रेनमध्ये बसविण्यात आले आहे. योग्य प्रतिसाद व मागणी वाढल्यास ते सर्वच गाड्यांमध्ये लागू होऊ शकेल. याबाबत रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल