सोलापूर : बाळ दिवसातून खूप वेळा डायपर ओले करत असते. याकडे पालक सहसा दुर्लक्ष करतात; पण डायपर ओले करण्याचे प्रमाण जास्त असेल तर बाळाला टाईप १ डायबिटीज असू शकतो.
टाईप १ डायबिटीज हा आजार लहान मुलांमध्येही आढळतो. या आजारात इन्सुलिनची निर्मिती व्यवस्थित होत नाही. यासाठी बाळाला बाहेरून इन्जेक्शन्स घ्यावे लागतात. थंड हवामान व पावसामध्ये बाळाला जास्तवेळा लघवी होऊ शकतो. मात्र, त्याचे प्रमाण जास्त वाटल्यास लवकर तपासणी करणे गरजेचे असते.
------
काय आहेत लक्षणे
- वारंवार लघवी करणे
- चीडचीड न करणे
- दूध कमी पिणे
- वजन कमी असणे
----
आई-वडिलांना डायबिटीज नसेल तर
अनेकदा आई-वडिलांना डायबिटीज असला तरच तो मुलाला होईल असा समज आहे; पण प्रत्येकवेळी असे असेलच असे नाही. त्यामुळे बाळ जर वारंवार डायपर ओले करत असेल, त्याच्या आई- वडिलांना डायबेटीज नसला तरी बाळांना डॉक्टरांकडे दाखवावे.
-------
बाळाला डॉक्टरांकडे कधी न्यावे
नवजात बाळ (० ते ३ महिने) दिवसातून २५ पेक्षा जास्त वेळा लघवी करत असेल, तीन ते नऊ महिन्यांपर्यंतचे बाळ २० पेक्षा जास्त वेळा लघवी करत असेल, नऊ महिन्यांपेक्षा मोठे असलेले बाळ दिवसातून १५ पेक्षा जास्त वेळा लघवी करत असेल तर तो टाईप वनचा डायबिटीज असू शकतो. त्यामुळे योग्यवेळी बाळांना डॉक्टरांकडे दाखवणे गरजेचे असते.
अनेकदा बाळ बेशुद्ध झाल्यावर तसेच बाळाला झटके आल्यावर पालक डॉक्टरांकडे तपासणीला आणतात. तपासणीनंतर बाळाला टाईप वन डायबिटीज असल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी बाळाच्या लक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. वेळेवर उपचार सुरू करावेत
- डॉ. शाकिरा सावस्कर, विभाग प्रमुख, बालविकार विभाग, शासकीय रुग्णालय
बाळ दूध किती पितो, त्याचे वजन किती आहे या लक्षणाकडे आई-वडिलांनी लक्ष देणे गरजेचे असते. बाळ सारखे डायपर ओले करत असेल तसेच बाळामध्ये इतर लक्षणे असतील तर तो टाईप वनचा डायबिटीज असू शकतो. म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विक्रम दबडे, बालरोग तज्ज्ञ