सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आस्थापनाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी फौजदारांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे. सोलापुरातील १३ फौजदारांच्या कोल्हापूर परिक्षेत्र व अन्य ठिकाणी बदल्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (२) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून एकूण २२ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २२ पैकी १३ पोलीस उपनिरीक्षक हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. सध्या सोलापुरातील फौजदार दत्तात्रय विठ्ठल मोरे यांची बदली पिंपरी चिंचवड आयुक्तालयात करण्यात आली आहे. फौजदार सचिन विश्वनाथ खटके, स्वामीराव चनबसप्पा पाटील, नारायण शंकर भोसले, रशीद दस्तगीर पठाण, चंद्रकांत हुळराप्पा जंगम, अजय दत्तात्रय हंचाटे या सहा जणांची कोल्हापूर परिक्षेत्र येथे बदली करण्यात आली आहे. फौजदार कैलास काकासाहेब कांबळे, शिवाजी वाचू राठोड यांची महामार्ग सुरक्षा पथक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
फौजदार सुनील नागनाथ मोटे यांची नागरी हक्क संरक्षण येथे बदली करण्यात आली आहे. विशाल महादेव दांडगे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली झाली आहे. या बदलीच्या यादीत अमरावती शहरातील तीन तर नाशिक शहरातील ६ फौजदारांचा समावेश आहे.
कार्यवाहीचा आदेश पाठविण्याचे आदेश...
- - जाहीर करण्यात आलेल्या यादीवरून बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना विनाविलंब कार्यमुक्त करावे. आगामी काळात लोकसभा निवडणूक होणार असल्याने त्यांच्या नवीन नियुक्तीच्या पदावर तातडीने हजर होणे आवश्यक आहे.
- - सर्व फौजदारांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कोणतीही रजा न उपभोगता कार्यभार स्वीकारावा. संबंधित प्रमुखांनी कार्यमुक्त व हजर झाल्याबाबतचा अहवाल २२ फेब्रुवारी २0१९ रोजी आपल्या कार्यालयास सादर करावा. निवडणूक आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिले आहेत.
- - बदलीच्या आदेशामुळे ज्या जागा रिक्त होणार आहेत त्या ठिकाणी कार्यभार संबंधित घटकप्रमुखांनी त्यांच्या घटकांतील इतर पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे तत्काळ सोपवावा, असे आदेश दिले आहेत.