पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील मागासवर्गीय वस्तीचा सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायत नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकाºयांना दिले आहे.
पटवर्धन कुरोली येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनाही ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याची नामुष्की आली होती. आता गावात काही प्रभागांमध्ये पाणी सोडले जाते. मात्र मागास वस्तीकडे सत्ताधाºयांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून महिला ग्रामपंचायत सदस्यांचे सासरे पंडित तवटे यांनीच इतर प्रभागामधील पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा बंद पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी करूनही उडवाउडवीची उत्तरे देऊन चालढकल केली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रार संतप्त नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी लक्ष घालून सहा महिन्यांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा लक्ष्मण डावरे, नामदेव डावरे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
याबाबतची तक्रार अद्याप आपल्याकडे आली नाही. ती बघून चौकशी करू व योग्य ती कारवाई करू. मात्र इतके दिवस पाणीपुरवठा बंद असूनही नागरिकांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देणे गरजेचे होते. बाकी कामांचीही माहिती घेतली जाईल.- एस. एस. नरळेविस्ताराधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर