माळेवाडी येथील साठे कुटुंबाला न्याय देण्यासंदर्भात त्यांचे पुनर्वसन करून, आरोपींना ताबडतोब अटक करून, कडक कारवाई करण्यासंदर्भात राज्यातील अनेक जिल्ह्यातून समस्त समाज, सर्व सामाजिक, राजकीय संघटना, संस्थांचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यासाठी अकलूज प्रांत कार्यालयावर नेलेल्या धडक मोर्चामध्ये सामील झाले होते.
आरोपींना तत्काळ अटक करावी, फिर्यादीचा, पीडित कुटुंबाचा पुरवणी जबाब त्यांच्या भाषेत घ्यावा, तपास अधिकारी बदलून मिळावा, फिर्यादी आणि साक्षीदार यांना खटला पूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त द्यावा, माळेवाडी गाव अत्याचार प्रवणक्षेत्र घोषित करावे, ॲट्रॉसिटी दाखल असलेल्या आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर करण्यासाठी तत्काळ सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे. सरकारी वकिलाची नेमणूक करावी, गावातील स्मशानभूमीपर्यंत रस्ता पंधरा दिवसात करावा, यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व एनडीएमजेचे प्रदेश राज्य सचिव वैभव गिते, लक्षवेधी संघटनेचे अनिल साठे, आरपीआयचे विकास धाईजे, दलित महासंघाचे राजाभाऊ खिलारे, किरण साठे, कीर्तिपाल सर्वगोड, प्रवीण माने, शेखर खिलारे, ज्ञानदेव खंडागळे, किरण धाईजे, नरेंद्र भोसले, भीमराव साठे, भारत आठवले, शामराव भोसले, अर्जुन साठे, संजय साठे, सोमनाथ खंडागळे, तात्या साठे, पीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी अकलूज पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.