देगाव स्मशानभूमी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
वाळूज : मोहोळ तालुक्यात देगाव (वा.) येथील लिंगायत समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीचे कंपाउण्ड काही ठिकाणी पडलेले आहे. पडलेल्या कंपाउण्डमधून पाळीव जनावरे, भटकी कुत्रे आतमध्ये प्रवेश करतात. गावात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. संबंधित प्रशासनाने तारेचे कंपाउण्ड आणि स्मशानभूमीत पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील लिंगायत समाजाने केली आहे.
शेरेवाडी - वाळूज रस्ता खराब
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज- शेरेवाडी रस्त्यावरील खडी उखडून गेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
हा मार्ग मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा रस्ता आहे. या मार्गावर वाड्यावस्तीवरील मुले, दूध वाहतूक, भाजीपाला यांची वाहने धावतात. खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी वाहनधारक यांच्यामधून होत आहे .
पाणीपुरवठ्याअभावी मनगोली तहानलेले
वाळूज : मोहोळ तालुक्यातील भोगावती नदीच्या काठी शंभर लोकवस्तीचे मनगोळी गाव वसलेले आले.
दीड महिन्यापासून गावाला पाणीपुरवठा ग्रामपंचायतकडून होत नाही. नागरिकांची पाण्यासाठी दूरवर भटकंती चालू आहे. ग्रामपंचायतीच्या बोअरमध्ये इलेक्ट्रिक मोटर अडकून पडली आहे. गेली ४५ दिवस गावाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावामध्ये हातपंप आहे, तोही बंद पडण्याच्या स्थितीत आहे.