सोलापूर : करमाळा शहरातून हज यात्रेसाठी गेलेल्या कुरेशी मोहल्लामधील बद्रुद्दीन हाशम बागवान (वय ६२) यांचे पवित्र मक्का शरीफ येथे निधन झाले. मुस्लीम धर्माच्या मान्यतेनुसार मक्का शरीफ येथेच त्यांचा दफनविधी करण्यात आला.
इस्लाम धर्मात हज यात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इमानदारीने धन कमावणाऱ्यांनी जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी, असे धर्मग्रंथात सांगितलेले आहे. यामुळेच दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी मक्का शरीफ व मदिना शरीफ येथे जातात. करमाळा शहर व परिसरातून यावर्षी तीस भाविक हज यात्रेसाठी गेले आहेत. यापैकी कुरेशी मोहल्ला येथील रिटायर्ड कंडक्टर तथा किराणा व्यापारी बद्रुद्दीन हाशम बागवान हे दि. ७ जून रोजी करमाळा येथून या यात्रेसाठी गेले होते. पवित्र मक्का येथे दर्शन झाल्यानंतर बद्रुद्दीन यांचे सौदी अरबच्या स्थानिक वेळेनुसार १०:३० वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. ११ जून रोजी पहाटे २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बद्रुद्दीन बागवान यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.