चपळगाव : जिथं उठायची हजारो स्वामी समर्थ भक्तांच्या पंगती तिथंच या कोरोनाकाळात गोरगरिबांना मदतीसाठी माणुसकीची बॅग भरल्याचे चित्र अन्नछत्र मंडळाच्या सभामंडपात दिसून आले. ३८ दिवसात ३१ हजार गोरगरिबांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जयहिंद फूड बँक यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
वंचितांच्या घरापर्यंत जाऊन हे अन्नदान करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जयहिंद फूड बँकेचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, हिरा बंदपट्टे, दादा लोणारी, सूरज जाधव, अतिश पवार, महेश निंबोळे, आकाश चौगुले, अमित कोळी, सागर पवार, मुदसर तांबोळी, नारायण वाघमोडे, ओंकार कांबळे, सिद्धू लव्हारे, प्रज्वल पाटोळे, विकास पवार, महेश भोसले यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
---
अन्नधान्याचे किट वाटणार
लाॅकडाऊनमध्ये छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे मागील ३८ दिवसांपासून रोज अन्नदान करण्यात येत आहे, पण जिथे तयार अन्न पोहोचवू शकत नाही अशा ठिकाणच्या गरजू लोकांसाठी ज्यांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या चुली बंद पडल्या आहेत, अशा गरजू हजार कुटुंबासाठी किमान १५ ते २० दिवस पुरेल असे अन्नधान्याचे किट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.