करमाळा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींपैकी सालसे व जेऊरवाडी या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींमधील ३९१ जागांसाठी ८६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मांगी, देवळाली, जातेगाव, शेटफळ व साडे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या निवडणुका होत आहेत. मांगी ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची निवडणूक होत असून मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या एकहाती सत्तेला सुजित बागल यांनी कडवे आव्हान दिले आहे. बागल गटाची हक्काच्या हिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बाळासाहेब पवार यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी आदिनाथचे उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी सरपंच राजेंंद्र मेरगळ, जयराज चिवटे, कैलास पवार यांनी सर्व विरोधकांची मोट बांधून तगडे आव्हान उभे केले आहे.
तालुका पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली ग्रामपंचायतीमध्ये लक्षवेधी लढत रंगली आहे. बागल गटाचे समर्थक आशिष गायकवाड यांनी रंगत आणली आहे. जातेगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना संजयमामा शिंदे, बागल, जगताप व नारायण पाटील गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कडवे आव्हान दिले आहे.
श्रीदेवीचामाळे येथे बागल विरोधी गट एकत्र
श्रीदेवीचामाळ येथे बागल गटाविरोधात सर्वच गट एकत्रित येऊन लढत देत आहेत. शेटफळमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे यांनी स्थानिक पातळीवर बागल गटाच्या काही कार्यकर्त्यांशी युती करून बागल व नारायण पाटील गटाच्या विरोधात लढत दिली आहे. साडे ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीच्या सदस्या जया जाधव यांचे पती दत्ता जाधव यांच्यासमोर सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन तगडे आव्हान दिले. कोंढेज येथे जगताप समर्थक राजेंद्र चांगण, पाडळी येथे गौतम ढाणे, निमगाव येथे सतीश नीळ पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.