नासिर कबीर
करमाळा : घड्याळाकडे पाहून बागल गटाने संजयमामा शिंदे यांना प्रचारात प्रामाणिकपणे साथ दिली असून, वंचित बहुजन आघाडीची चावी चांगलीच फिरली. मतविभागणीचा फटका कोणाच्या मताधिक्याला ब्रेक लावणार याची गणितं मांडली जाऊ लागली आहेत. आम्हीच मताधिक्य घेणार, असा दावा कमळ व घड्याळवाले करू लागले असून, मताधिक्यावर पैजाही लागल्या आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा शहरासह ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरासह ३६ गावांचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ३ लाख २ हजार ८९५ मतदारांपैकी १ लाख ८८ हजार ९९९ इतके म्हणजे ६२.४० टक्के मतदान झाले आहे. निवडणूक रिंगणात तब्बल ३१ उमेदवार आमने-सामने होते. पण खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे विरूध्द भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर या दोघांतच आहे.
झेडपी अध्यक्ष संजयमामा शिंदे करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने आपला विधानसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याचे समजून बागल गटाने रश्मी बागल आता आमदार होणार म्हणून संजयमामांना कसल्याही परिस्थितीत करमाळ्यातून मताधिक्य मिळवून द्यायचेच या विचाराने संपूर्ण प्रचार यंत्रणा बागल गटाने सांभाळली. विशेष म्हणजे संजयमामा शेवटच्या प्रचार सांगता सभेच्या दिवशी एकदाच राजुरीमध्ये आले. पण त्यांच्या पश्चात यशवंत शिंदे यांच्या साक्षीने रश्मी बागल, दिग्विजय बागल या दोघांनी तालुक्यात प्रत्येक गावात मतदारांच्या गाठीभेटी व सभांद्वारे प्रचार केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीपासून एकमेकांपासून दुरावलेले आ. नारायण पाटील व जगताप गट पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले तर निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आ. जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी भाजपत प्रवेश करून आपला राजकीय प्रवासही सुरू केला आहे. तालुक्याच्या राजकारणात बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते असलेला भाजप मोहिते-पाटील व जगताप यांच्या प्रवेशाने तालुक्यात मोठा पक्ष बनला आहे.
गतवेळी सदाभाऊंना मताधिक्य
- - गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना १६ हजारांचे मताधिक्य करमाळा मतदारसंघातून मिळाले होते.
नेहमीच काँग्रेसविरोधकांना मताधिक्य
- - २००९ ची लोकसभा निवडणूक वगळता येथे काँग्रेसच्या विरोधकांनाच मताधिक्य मिळत गेलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन मतदार वाढला असून, त्यांचा कौल कोणला? विजयी होण्याची क्षमता नसलेल्या वंचित बहुजन आघाडीस मिळालेला प्रतिसाद, शहरात कमळ तर ग्रामीण भागात घड्याळ या चर्चेने कोणाला मताधिक्य मिळणार, याविषयी चर्चा सुरू आहे.