वैराग : येथील विद्यामंदिर संस्थेच्या संचालकांनी बनावट दाखल्याच्या आधारे चार सदस्यांच्या जाती बदलून अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांचा जामीन बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती तक्रारदार अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
१९५४ साली स्थापन झालेल्या विद्यामंदिर या संस्थेचे सभासद हे सर्व जातीधर्मीय आहेत. मात्र मृणाल भूमकर व इतर सात जणांनी काही सदस्यांची बनावट कागदपत्रे तयार करून सर्व सदस्य अल्पसंख्याक असल्याचे दाखवून शासनाच्या हस्तक्षेपाविना नोकरभरतीचे पूर्ण अधिकार मिळवले होते. याबाबत सावंत यांनी सर्व संचालकांविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे भूमकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु बार्शी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
--
आम्ही कसलीही फसवणूक केली नाही.
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आठ दिवसांची मुदत आहे. अपील करण्यासाठी उच्च न्यायालयात लवकरच जाणार आहोत.
- मृणाल भूमकर
अध्यक्ष, विद्यामंदिर संस्था, वैराग
---