सोलापूर : आपल्या कमाईतील थोडासा भाग समाजाच्या कल्याणासाठी, गरजूंसाठी देण्याची रीत इस्लाममध्ये आहे. याला ‘बैतुलमाल’ असे म्हणतात. बैतुलमाल पुरुषच करत असतात. मात्र देशात बहुधा पहिल्यांदा महिलांकडूनमहिलांसाठी बैतुलमाल करण्याची सुरुवात सोलापुरातील महिलांनी केली आहे. ‘औरतोंका बैतुलमाल औरतों के लिए औरतों के जरिए’ या संकल्पनेवर याची स्थापना करण्यात आली आहे. यात सोलापुरातील ३५ महिलांचा समावेश आहे.
लष्कर परिसरात राहणाºया निवृत्त शिक्षिका चाँद सुलताना सय्यद यांना ही कल्पना सुचली. मुस्लीम समाजात अनेकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांच्या मदतीसाठी बैतुलमालच्या माध्यमातून मदत गोळा केली जाते. या बैतुलमाल मुख्यत: पुरु षच चालवत असतात. महिलांनादेखील मदतीची गरज असते. बैतुलमाल पुरुषच चालवत असल्याने त्या मदतीसाठी कुठे जात नाहीत. जर महिलांसाठी महिलांकडूून बैतुलमाल सुरु केला तर अशा गरजू महिलांना मदत करणे सोयीचे होईल या विचाराने महिलांसाठी बैतुलमालची स्थापना करण्यात आली. फक्त मुस्लीम नव्हे तर इतर धर्मांतील महिलांनाही मदत केली जाते.
अशा गरजेसाठी होते मदत... - चाँद सुलताना सय्यद या २००६ साली आपल्या स्वत:च्या पैशातून मदत करत होत्या. अपंगांना मदत करणे, गरजूंना धान्य देणे, महिलांच्या बचत गटांचे पैसे भरणे, मुलांच्या शाळेची फी भरणे, वीज बिल भरणे आदी मदत त्या स्वत:च्या पैशाने करत होत्या. जर महिलांसाठी बैतुलमाल सुरु केल्यास महिला कोणतीही शंका मनात न ठेवता मदत मागतील व त्यांना अशी मदत करणेही सोपे जाईल, या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली. बैतुलमालच्या माध्यमातून रमजान महिन्यात जकात गोळा केली जाते. यातून गरजवंतांना मदत केली जाते.
माझे वय सध्या ६० आहे. माझ्यानंतर गरजू महिलांना मला मदत करता येणार नाही. याचा विचार करुन गरजूंना फक्त धान्य आदींची मदत न करता त्यांना स्वत:च्या पायावर उभे करावे असा विचार आला. त्यातूनच विधवा व घटस्फोटित महिलांना मोफत शिलाई यंत्र देण्याचा उपक्रम घेत आहे. बैतुलमालमधील पैसे व माझ्या निवृत्ती वेतनातील काही भाग याचा वापर मी मदतीसाठी करत आहे. - चाँद सुलताना सय्यद, निवृत्त शिक्षिका़