सोलापूर : तालुक्यातील कुंभारी, होटगी-सावतखेड या मोठ्या ग्रामपंचायती राखण्यात भाजपाला यश आले असले तरी भंडारकवठे, मुस्ती, माळकवठे, तांदुळवाडी ग्रामपंचायती भाजपाच्या हातातून गेल्या आहेत. तालुक्यात काँग्रेस, सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेल्या स्थानिक विकास आघाड्यांना मतदारांनी पसंती दिली आहे.
सर्वाधिक चुरस असलेली होटगी ग्रामपंचायत भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी गटाने जिंकली. त्यांच्या गटाला १०, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील गटाचा पराभव झाला. कुंभारीत सत्तांतर घडले. काँग्रेसच्या अप्पू बिराजदार गटाला भाजपच्या शिरीष पाटील, जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे गटाने पराजित केले. दोन स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. मुस्तीमध्ये भाजपचे सुनील कळके, महादेव पाटील गट पराभूत झाला. १० वर्षांची सत्ता उलथून टाकण्यात काँग्रेसचे माजी सभापती भिमाशंकर जमादार, कल्याणराव पाटील यशस्वी ठरले. या गटाला १४, तर कळके गटाला एक जागा मिळाली.
भंडारकवठे, माळकवठे, मद्रे, तांदुळवाडी, टाकळी येथे मतदारांनी भाजपाला नाकारले. माजी आमदार दिलीप माने यांचा गट सक्रिय झाला आहे. गुंजेगाव, वडापूर, माळकवठे येथे सत्ता काबीज करण्यात हा गट यशस्वी ठरला.
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. मुस्ती, मुळेगावतांडा ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या. भाजपाला फारसा प्रभाव टाकता आला नाही. मुस्ती, तांदुळवाडी हातातून गेल्याने आ. कल्याणशेट्टी गटाची पीछेहाट झाली. अन्यत्र स्थानिक आघाड्यांनी झेंडा रोवला.
--------
पराभूत दिग्गज
कुंभारी - माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार यांना स्वतंत्र उमेदवार योगेश पुजारी यांनी पराभूत केले. भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य सागर तेली हे देखील पराभूत झाले. होटगी स्टेशन - काँग्रेसचे सुभाष पाटोळे आणि सेनेचे माजी तालुकाप्रमुख बापू कोकरे यांना समान मते पडली. चिठ्ठीद्वारे पाटोळे यांना विजयी घोषित करण्यात आले.
टाकळी - काँग्रेसचे सिद्धाराम घोडके या जावयाने सासू सुशीला ख्यामगुंडे यांच्यासह पॅनलला पराभूत केले.
----------