सोलापूर : बेगमपूरचा रहिवासी बालाजी दत्तात्रेय लोहकरे (वय ३८) हा पदवीधर युवक इतर तरुणांप्रमाणे पदवीनंतर नोकरीच्या मागे लागला नाही. त्याच्या साडेचार एकर शेतीवर आधुनिक शेती अन् अभ्यासू शेती करण्यास त्याने प्राधान्य दिले. लवकरच शेतात त्याचं मन रमलं आणि तो वार्षिक १५ लाखांहून अधिक उत्पन्न घेऊ लागला.
दरम्यान, आज त्याचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात येतात. रिलायन्ससारख्या मार्केटमध्ये त्याचे डाळिंब विक्रीला लागले. शेतीला आणि शेतकऱ्याला दोष देणाऱ्यांना बालाजी हा अचूक उत्तर आहे, असे त्याचे गावकरी, मित्रमंडळी मोठ्या अभिमानाने सांगतात. बालाजी हा शेतातील सुख-दुःख फेसबुकवर मांडतो. पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्याची माहिती फेसबुकवरून देतो. भरघोस आणि नैसर्गिक पिकाविषयी तो मोठ्या प्रेमळ आणि अभ्यासूवृत्तीने विवेचन करतो. फेसबुकवर त्याचे पोस्ट वाचून जो तो त्याच्या प्रेमातच पडतात. बालाजी सोबत त्याचे कुटुंबीय आणि लहान मुलेही शेतीचे माहितीगार बनले आहेत. एकरात तीन पिके घेतो. दर साठ दिवसानंतर त्याला चांगले उत्पन्न मिळते.
-------
मोठे व्यापारी येतात शेतात...
शेतातील भाजीपाला विकण्यासाठी बालाजीला कधी शेताबाहेरही जावे लागले नाही. आज मोठे व्यापारी त्याच्या शेतात येऊन भाजीपाला जागीच खरेदी करतात. सुरुवातीला त्याने शेतात डाळिंब घेतला, डाळिंबासाठी सलग तीन वर्षे रिलायन्स मॉलवाले त्याच्या शेतात यायचे.
मार्केटचा अंदाज घेऊन शेती करायला हवं
आजच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. शेती हा व्यवसाय धोकादायक आणि कठीण बनला आहे. कर्जापायी अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. बालाजी हा इतर शेतकऱ्यांप्रमाणे अल्पभूधारक आहे. त्याने शेतीत काही प्रयोग केले. मार्केटचा अंदाज घेतला आणि अभ्यासू पद्धतीने शेती करू लागला. त्याला यातून अनेक उत्तरे मिळाली. त्यामुळे तो स्वावलंबी झालाच. उलट उत्पादनात दिवसेंदिवस वाढ देखील मिळू लागली.
जिल्ह्यातील क्षेत्रनिहाय शेतकऱ्यांची संख्या
- अत्यल्प भूधारक : (एक हेक्टर पर्यंत)
- तीन लाख २५ हजार ३८७ शेतकरी
- एकूण हेक्टर : एक लाख ४३ हजार १५८ हेक्टर
...........
अल्पभूधारक : (दोन हेक्टर पर्यंत)
- दोन लाख २६ हजार चारशे शेतकरी
- तीन लाख ७८ हजार ५ हेक्टर
..........
मध्यम शेतकरी : (चार हेक्टरपर्यंत)
- दोन लाख वीस हजार ६३९ शेतकरी
- सात लाख ४७ हजार ९७३ हेक्टर
..........
मोठा शेतकरी : (दहा हेक्टरच्या पुढे)
- ५ हजार १५ शेतकरी
- ८० हजार ४९६ हेक्टर