सोलापूर - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे नव्हे तर मुंबईतील नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नागरिक, व्यापाऱ्यांनी सहभागी होउ नये, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर या महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवहेलनेचा निषेध करीत आहोत. ज्यांनी अवमानकारक वक्तव्ये केली त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. परंतु, शहरातील काही नेत्यांना मुंबईतील नेत्यांचा आदेश आला. या नेत्यांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे नाव वापरुन बंद पुकारला.
वास्तविक या नेत्यांनी त्यांच्या पक्षाचे बॅनर वापरुन बंद पुकारायला हवा होता. या लोकांनी कुणालाही विश्वासात न घेता बंद पुकारला. कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता लोकांना बंद नको आहे. व्यापारी, शिक्षण संस्था, नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होउ नये. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव, दिलीप कोल्हे, मनसेचे विनायक महिंद्रकर, श्रीकांत घाडगे, तुकाराम मसके, प्रशांत इंगळे, किरण पवार आदी उपस्थित होते.
उदयनराजे आले तर बंदमध्ये सहभागी होणार
सोलापुरातील नेते कुणाला तरी खूश करायला आंदोलन करतात असे तुम्ही म्हणता. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आंदोलन केले. हे कशासाठी होते या प्रश्नावर अमोल शिंदे म्हणाले, उदयनराजे आमचे दैवत आहे. उदयनराजे सोलापुरात येउन आंदोलन करणार असतील तर आम्ही सर्वजण बंदमध्ये सहभागी होउ, असे शिंदे म्हणाले.