सोलापूर : सोलापूरकरांसाठी अत्यंत भूषणावह चार हुतात्म्यांपैकी एक कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला इयत्ता आठवीच्या बालभारतीमधील (मराठी) धडाच आता वगळण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरु होतील याविषयी निश्चिती नाही. यामुळे अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेण्यात आला. सोलापूरकरांनी धडा वगळण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पण भगतसिंग, राजगुरु यांच्यासमवेत सुखदेव यांचे नाव नसल्यामुळे आक्षेप घेण्यात आला होता. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काही संघटनांनी केली होती.
लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील लेख जसाच्या तसा आठवीच्या बालभारती पुस्तकात वापरण्यात आला आहे. हुतात्मा कुर्बान हुसेन यांनीही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे बलिदान दिलेले आहे. इंग्रजांनी त्यांच्यासह सोलापूरच्या मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिसन सारडा यांना फासावर चढविले होते. असे असताना कुर्बान हुसेन यांच्या नावावर आक्षेप घेतल्याबद्दल सोलापुरात संताप व्यक्त झाला होता.
अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते.
पद्यपाठही वगळले!यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी हा सध्या संपून गेला आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत पूर्ण अभ्यासक्रम घेणे शक्य होणार नाही. याचा विचार करुन शिक्षण मंडळाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. आठवीच्या बालभारतीमध्ये ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे ’या धड्यासोबतच ‘धाडसी कॅप्टन : राधिका मेनन’, ‘फुलपाखरे’, ‘लिओनार्दो द व्हिंची’ (स्थूलवाचन), तसेच ‘नव्या युगाचे गाणे’, ‘विद्याप्रशंसा’, ‘अन्नजाल’ हे पद्यपाठ देखील वगळले आहेत.
हुतात्मा कुर्बान हुसेन हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी ‘गझनफर’ हे उर्दू भाषेतील साप्ताहिक सोलापुरात सुरु केले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, स्वदेशी या पंचसूत्रीवर ते काम करत होते. यंदाचे वर्ष हे लोकमान्य टिळकांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. या वर्षी टिळकांचे अनुयायी हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला धडा वगळण्यात आला. हा हुतात्म्यांचा अपमान आहे. याचे मला मनस्वी दु:ख होत आहे.- डॉ. श्रीकांत येळेगावकर