आप्पासाहेब पाटील
सोलापूर - केंद्रीय अर्थसंकल्पात २० कोटी रूपयांची तरतूद झाल्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-उस्मानाबाद अशा ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे. भूसंपादनासाठी लागणार्या सर्व बाबींची पुर्तता करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या सोलापूर- उस्मानाबाद या मार्गावर ८ स्थानके नव्याने होणार असून यासाठी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४० गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या योजनेत सोलापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईत या रेल्वे मार्गाच्या कामाची सुरवात झाली. त्यानुसार मुंबईतील रेल इंडिया टेक्निकल इकॉनॉमिक सर्व्हिसेस कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात आला. रेल्वे मार्गासाठी लागणारी जमिनी, स्थानकांवरील सोयी-सुविधा, भुयारी मार्ग, फ्लाय ओव्हर याबाबत आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. ही एजन्सी लवकरच किती लोकांची जमीन जाणार, किती निधी लागणार यासह अन्य छोटया मोठया गोष्टींबाबत आराखडा तयार करून देईल. त्यानंतर हा आराखडा रेल्वे मंत्रालयास सादर केल्यानंतर त्यावर चर्चा, विचारविनिमय होऊन त्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्याचे मान्य करेल, त्यानंतर भूसंपादनासाठीची मुख्य प्रक्रिया सुरू होईल, संबंधितांना नोटीसा जातील, कोणाचीही हरकत नसेल तर भूसंपादन होईल त्यानंतर मुख्य कामासाठी पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे आराखडा तयार करून रेल्वे मार्गासाठी निधीची मागणी होईल, निधी मंजूर झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काम हाेईल, काम सुरू झाल्यानंतर साधारण- एकते दीड वर्षाच्या आत हा मार्ग तयार होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ही आहेत नवे रेल्वे स्टेशन
- सोलापूर
- खेड
- मार्डी
- तामलवाडी
- माळुंब्रा
- रायखेल
- तुळजापूर
- वडगांव
- सांजा
- उस्मानाबाद
या गावातील जमीन भूसंपादन होणार
सोलापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात असलेली बाळे, केगांव, भोगांव, गुळवंची, कारंबा, बाणेगांव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगांव काटी, तामलवाडी, गंजेवाडी, सुरतगांव, सांगवीकाटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगळरूळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, मोरदा, बावी, कावलदारा तांडा, धारूर, खामसवाडी, उत्तमी कायापूर, वडगांव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, उस्मानाबाद, सांजा, शिंगोली, उपळाई, जहागीरदारवाडीपर्यंत हा मार्ग असणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. भूसंपादन व इतर बाबींचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच ही एजन्सी अहवाल देईल, त्यानंतर हा अहवाल रेल्वे मंत्रालयास सादर होईल. भूसंपादनासाठी निधी त्वरीत मिळाल्यानंतर दीड ते दोन वर्षात हा मार्ग पूर्ण होईल.
- शैलेश गुप्ता,
विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे.