सलग तीन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्याने यंदाही खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, तर सततच्या पावसामुळे आणखी पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी सतत पाऊस पडत असल्यामुळे माळरानासह शेतातून खाण्यास मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय बेंदूर (प्रतिपोळा बैल पोळ्याचा) सण साजरा होत आहे.
मागील दोन- तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बैलांसह जनावरांना वर्षभर लागणारे सुती, नायलॉन कासरे, वेसण, कंडे, म्होरक्या, पट्टे, चाबूक, पितळी घुंगरी, झुली, शेंब्या, बेगड, हिंगूळ साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. वर्षभर काळ्या आईची इमाने-इतबारे सेवा करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी महाराष्ट्रीय बेंदूर आनंदाने साजरा करतात. त्या अनुषंगाने बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला २१ जुलै रोजी शेतकऱ्यांनी मोळाच्या साह्याने बैलांची तेल व हळदीने खांदे मळणी केली. त्यांना ज्वारीचा खिचडा खाण्यास देऊन विश्रांती दिली.
‘चावर... चावर... चांगभलं’चा गजर
गुरुवारी शेतकऱ्यांनी बैलांसह जनावरांना नदी, ओढा आदी पाण्याच्या ठिकाणी अंघोळ घालून स्वच्छ केले. त्यांच्या शिंगांना हिंगूळ व विविध रंगबेरंगी बेगड लावून सजवले. सायंकाळी सूर्यास्तावेळी बैलांना घरासमोर बांधून त्यांची अर्धांगिनीच्या साथीने पूजा केली. यावेळी शेतकऱ्यांनी डोक्यावर शेती अवजारे घेऊन त्यावर घोंगडी पांघरून बैलांच्या सभोवताली फिरून ‘चावर... चावर... चांगभलं, पाऊस आला चल म्होरं’ अशी आळवणी करीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्यही भरविण्यात आला. दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांसह सर्जा-राजाच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.