करमाळा : चांगला भाव मिळेल म्हणून नवीनच असलेल्या अद्रक पिकाकडे शेतकरी वळले; पण गेल्या वर्षभरापासून कोरोना लॉकडाऊनमुळे अद्रकची मागणी घटली आहे. सातत्याने भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. अद्रकची ही फोडणी शेतकऱ्यांना पचलीच नाही, अशी स्थिती झाली आहे.
स्वादिष्ट, रूचकर व चमचमीत जेवणात व कडक चहामध्ये अद्रकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अद्रक हे सर्वच ठिकाणी उपयुक्त असल्याने मागणी व भावही जास्त मिळतो म्हणून करमाळा तालुक्यातील सालसे, साडे, सौंदे, गुळसडी, मांगी, हिवरवाडी, भोसे या भागात सव्वाशे एकरांत अद्रकची लागवड गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.
गतवर्षापासून कोरोनामुळे हॉटेल, खानावळ बंद असल्याने अद्रकच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. परिणामी भावात घसरण सुरू आहे. यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. २०१९ मध्ये अद्रकचा भाव सात ते नऊ हजार रुपये क्विंटल होता, त्यामुळे अद्रक पीक शेतकऱ्यांना भरपूर नफा देऊन गेले.
---
अर्थकारण बिघडले
गेल्या दोन वर्षांत अद्रकचे उत्पादन जेमतेम असताना भावातील घसरणीने खर्चही निघेनासा झाला आहे. २०२० मध्ये प्रतिक्विंटल तीन ते चार हजार रुपये भाव मिळाला; पण सध्या अद्रकला सातशे ते एक हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.
----
एक एकर अद्रक लावण्यासाठी नांगरणी, बेड तयार करणे, बेणे, शेणखत, औषध फवारणी व काढणी असा नव्वद हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अद्रकचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, भावात घसरण असल्याने खर्चदेखील निघालेला नाही.
- सुचित बागल, शेतकरी मांगी.
-----
१०करमाळा-अद्रक
करमाळा तालुक्यातील मांगी येथील अद्रक पिकाचे क्षेत्र.