सांगोला तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व फळपिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने मंगळवारी तालुक्यातील हायवेवरील संगेवाडी, बामणी, वाढेगाव या गावांचा एक तासाचा धावता दौरा केला.
पथकाने संगेवाडी येथील शिवाजी तुकाराम व्होवाळ यांच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे पाणी साचून नुकसान झालेल्या ज्वारी पिकाची पाहणी करून बामणी येथील अवि पोपट देशमुख व वाढेगाव येथील गोविंद गोपाळ चौगुले यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी यहापर और किसी की खेती खराब हो गयी क्या, पंचनामा हुआ क्या, सहाय्यता मिली क्या असा हिंदीत शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांकडून ‘बाढ से कितना नुकसान हुआ है, गत साल में अनारसे मुनाफा मिला, और बाढ से अनार का कितन नुकसान हुआ’ अशी विचारणा केली. यावर डाळिंब उत्पादक शेतकरी गोविंद चौगुले यांनी अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचल्याने फळ धारणा झालेली बाग गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
यावेळी शेतकरी अनिरुद्ध पुजारी यांनी ठेकेदाराच्या चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कामावर माती भरला टाकल्यामुळे पुराचे पाणी शेतात कसे शिरले याविषयी आधिकाऱ्यांना संगणकाच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने तहसीलदार अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सोनवणे, पशुसंर्वधन अधिकारी डाॅ. नरळे, पशुधन विकास आधिकारी असलम सय्यद, बांधकाम अभियंता अशोक मुलगीर यांच्यासह सरपंच नंदकुमार दिघे, प्रगतिशील शेतकरी अनिरुद्ध पुजारी शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ
केंद्रीय पथकातील ग्रामविकास विभाग उपसचिव यशपाल, रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी दौऱ्यात सांगोला (वाढेगाव) येथील गोविंद चौगुले व अनिरुद्ध पुजारी यांच्या डाळिंब बागेची पाणी करून नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह अधिकारी शेतकरी.