माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, सत्ताधारी व विरोधी पक्ष, संघटना यांच्या बदलत्या धोरणामुळे नेमका कोणता निर्णय घ्यावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विजेचे बिल न भरल्यास वीजपुरवठ्याची देखभाल कशी करायची? तर सरकारही आपल्या निर्णयाबाबत धरसोड करत आहे. विरोधी पक्ष वीजतोडणीविरूद्ध आक्रमक आहे. यामुळे शेतकरी मात्र संभ्रमात आहेत.
महावितरणचा गाडा हाकण्यासाठी पैशांची गरज असल्याने बिलांच्या वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. सत्तेत नसताना वीजबिल भरू नका, म्हणणारे नेते सरकारमध्ये आल्यानंतर वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देत आहेत. मनसे, शेतकरी संघटनेसह काही संघटना वीजबिलाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये, यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. त्यामुळे नेमके वीजबिल भरावे की नको, याबाबत शेतकरी संभ्रमात सापडला आहे.
वीजबिलाबाबत बळीराजा चिंतातूर
आपण वापरत असलेल्या विजेचे पैसे भरण्याबाबत शेतकऱ्यांचे दुमत नाही. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी, हवामानातील अनिश्चितता, कोरोना महामारी, बेभरवशी बाजारभाव व पिकांवरील वाढत्या रोगांमुळे शेतीचा खर्च व उत्पन्न याचे बिघडलेले गणित, सत्तेची पोळी भाजण्यासाठी विविध पक्षांनी दिलेली वीजबिल माफीची आश्वासनं यामुळे वीजबिलांचा डोंगर वाढत गेला. यामुळे वीजबिल भरणे सध्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शेतकरी सध्या वीजबिलाबाबत चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.
कोट ::::::::::::::::::::
सध्याची योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या रकमेतून थेट निधी वापरला जातो. शिवाय शेतकऱ्यांना योग्य क्षमतेने व वेळेत वीज मिळण्यासाठी वीजबिलाचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा.
- ए. एल. वडार
कार्यकारी अभियंता, अकलूज
कोट ::::::::::::::::::
शेतकऱ्यांनी वीजबिल भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या योजनेत हप्त्याने बिल भरण्याची सुविधा असावी. सध्या कोरोना महामारी व इतर संकटांमुळे कृषी व्यवसाय संकटात असल्याने मुदतवाढ मिळावी, वीजपुरवठा कायम राहावा.
- उपेंद्र केसकर
अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत