महाराष्ट्र शासन, द महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने वखार महामंडळ सांगोला येथे शासकीय भरड धान्य आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ७ डिसेंबर रोजी मका खरेदी केंद्र सुरू केले आहे.
शासनाने मक्याची आधारभूत किंमत प्रति क्विंटल १८५० रुपये ठेवली आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात ६ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक घेतल्याने उत्पादन वाढले आहे. मका खरेदी केंद्राकडे तालुक्यातील ४८५ शेतकऱ्यांनी १८ हजार क्विंटल मक्याची नोंदणी केली आहे. मंगळवार, १५ डिसेंबरपर्यंत मका खरेदी केंद्रावर ७० शेतकऱ्यांनी २२ लाख ३२ हजार ९५० रुपयांची १२०७ क्विंटल (२४२४ कट्टे) मका खरेदी केली आहे. शेतकऱ्यांकडून मका खरेदी केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने १८ हजार क्विंटल मका गोडाउनमध्ये साठा होऊ शकतो, असे नियोजन केले आहे.
-----
दररोज ३०० क्विंटल खरेदी
शेतकऱ्यांकडून आलेल्या १०० किलो पोत्यातून मका वेगळा करून ५० किलोचे कट्टे बनवून गोडावूनमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानुसार दररोज २५० ते ३०० क्विंटल मका खरेदी केली जात आहे. त्यामुळे मका ठेवण्यासाठी वखार महामंडळाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २५ रुपये हमाली द्यावी लागत आहे.
पुढील आदेशापर्यंत केंद्र सुरू राहणार!
मका खरेदी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानुसार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मका खरेदी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मका खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न समिती व खरेदी-विक्री संघाने केले आहे.