टेंभुर्णी : क्रिकेट खेळताना मारलेला चेंडू घराच्या गच्चीवर गेला व तो आणण्यासाठी गेलेल्या दहा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचा घराच्या गच्चीवरून गेलेल्या विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. साईनाथ इंगळे असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुर्ली रोडलग राहत असलेल्या अतिश दौलत इंगळे यांचा दहा वर्षांचा साईनाथ इंगळे हा मुलगा १६ जानेवारी रोजी इतर मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळत होता. खेळताना बॉल राहुल गडगडे यांच्या घराच्या छतावर जाऊन पडला. तो आणण्यासाठी साईनाथ इंगळे गडगडे यांच्या घराच्या छतावर गेला. या घराच्या गच्चीवरून महावितरण कंपनीच्या मेनलाइनच्या विद्युत वाहकतारा अगदी हाताच्या अंतरावरून गेलेल्या आहेत. परंतु खेळाच्या नादात असलेल्या साईनाच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. त्याचा स्पर्श या विद्युततारांना झाला त्यामुळे त्याला जोराचा शॉक बसला.
धक्का एवढा मोठा होता की, साईनाथ हा गडगडे यांच्या घराशेजारील महेंद्र लोकरे यांच्या घराच्या छतावर जाऊन पडला. विद्युत शाॅकमुळे साईनाथचे शरीर होरपळून निघाले. गंभीर जखमी अवस्थेत साईनाथला उपचारासाठी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये नेले होते. उपचार चालू असताना त्याचा दिनांक २१ जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.
या धक्क्यातून सावरल्यानंतर साईनाथचे वडील आतिश इंगळे यांनी हिरालाल गडगडे व महेंद्र बब्रुवान लोकरे यांना साईनाथ इंगळे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी केली आहे.
----
मेनलाइनजवळ घर बांधल्याने घडली दुर्दैवी घटना
फिर्यादीत म्हटले आहे की, हिरालाल गडगडे व महेंद्र लोकरे यांनी कोणताही बांधकाम परवाना न घेता महावितरण कंपनीच्या मेल लाइनच्या तारा हाताला येतील एवढ्या अंतरावर घरे बांधली आहेत. त्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. परवानाविना घरे तत्काळ पाडावीत कारण भविष्यात आणखी एखाद्याचा जीव घरावरून गेलेल्या विद्युत त्यामुळे जाऊ नये असे म्हटले आहे.
फोटो:- मयत साईनाथ इंगळे