पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५२४ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये ३२८ मूळ मतदान केंद्रे असून, १९६ सहायक मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांसाठी ५२४ कंट्रोल युनिट, १,०४८ बॅलेट युनिट व ५२४ व्हीव्हीपॅट मशीन असतील, तसेच २१० कंट्रोल युनिट, ४२० बॅलेट युनिट, २६० व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात येणार आहेत. ५३ मतदानयंत्रे मतदार जागृती व प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. मतदानयंत्रे बॅलेट पेपर लावल्यानंतर सीलबंद करण्यात येत आहेत. या प्रक्रियेवेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवारांना आमंत्रित केल्याचे गुरव यांनी सांगितले.
प्रत्येक टेबलवर अधिकाऱ्यांची नियुक्ती
पंढरपूर येथे ३० टेबलवरून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सील करण्याचे कामकाज सुरू आहे. यासाठी प्रत्येक टेबलवर मंडलाधिकारी अथवा झोन ऑफिसर, दोन तलाठी, कोतवाल यांचे पथक नेमले आहे. स्ट्राँग रूम व मतदान साहित्य देण्यासाठीही पथकांची नियुक्ती केली आहे. ५ टेबलवर २६ मतदानयंत्रांवर एक हजार मतांचे प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे यांनी सांगितले. प्रक्रियेवेळी शासकीय धान्य गोदाम येथे निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.