सोलापूर : देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात ९०४ सोलापूरकर सैनिकांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सीमेवरूनच मतदान केले आहे. १८०२ मतदार असलेल्या सैनिकांपैकी ९०४ सोलापूरकर सैनिक मतदारांनी टपाली मतदान केले आहे.
निवडणूक कार्यालयाने पाठवलेल्या मतपत्रिकांवर बारकोड सिस्टीम असून या मतपत्रिकांचे ४ वेळा स्कॅनिंग होणार आहे. त्यानंतरच मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे, अशी माहिती टपाली मतदान कार्यप्रणालीचे प्रमुख तथा महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान झाले. ७ मे पूर्वी एकूण २७२९ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. यात ९०४ सैनिक मतदारांचा समावेश आहे. ८५ प्लस १२२२ ज्येष्ठ मतदारांनी घरूनच मतदान केले. १२४ दिव्यांग मतदारांनी घरात बसूनच मतदान केले. सोलापूर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या ९१४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परजिल्ह्यातून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी टपाली मतदान केले आहे.