राजीव लोहकरे
अकलूज : देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पताकाधारी स्वारारुढ मोहिते -पाटील यांचा बलराज अश्व गुरूवारी दुपारी पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करून देहुकडे रवाना झाला. दरम्यान, ५ वर्षे वयाचा बलराज उदयपूर राजघराण्यातील जातीवंत मारवाड अश्वाचा अबलख वंश असून त्याचे हे सोहळ्यातील ३ रे वर्ष आहे. पालखी सोहळ्यातील रिंगणात देवाचा व पताका धारी स्वाराचा असे दोन मानाचे अश्व असतात. त्यापैकी पताकाधारी स्वाराचा अश्व देण्याची प्रथा गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सुरु केली असून ती प्रथा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे पुढे चालवित आहेत.
मोहिते पाटील कुटुंबाकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीही अश्व दिला जायचा. मात्र पुढे सुमारे ४० वर्षापुर्वी श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अश्व अचानक आजारी पडल्याने देहु संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे एक अश्व कायमस्वरुपी देण्याची मागणी केली, ती त्यांनी मान्य केली. ती परंपरा आजतागायत जपली आहे.
या सोहळ्याला जाण्यापूर्वी या बलराज अश्वाची व्यवस्थित निगा राखावी लागते. त्याचा खुराक, व्यायामासाठी आमचे कर्मचारी घोडेस्वार वैभव गायकवाड, घोडा सेवेकरी तुळशिराम पवार,अजित पवार, अनिल चव्हाण, एकनाथ जावीर व राजु निकाळजे कष्ट घेत असतात असे सांगितले. यावेळी माणिकराव मिसाळ, सतिश पालकर, आण्णासाहेब इनामदार, आण्णासाहेब शिंदे, मयुर माने, सचिन गायकवाड, रंजित देशमुख, नवनाथ साठे, निखिल पुले, नितिन साखळकर, चंदकांत कोळेकर, रवी यादव, शहाजी आघाडे, श्रीमंत लांडगे, ज्योती कुंभार जनसेवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.