सोलापूर: शहरात शांततेबरोबर कायदा व सुवव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या लोकांना प्रवेश बंदी करावी. अशी मागणी सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त डॉ.राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
६ जानेवारी रोजी शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा दरम्यान कौंतम चौक येथे दगडफेकी सारखा प्रकार घडला. त्यानंतर सभा झाली, त्या ठिकाणी नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार धोकादायक आहे. सोलापूर हे शांतताप्रिय शहर आहे, येथे सर्व जाती धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. मात्र केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी व जातीय तेढ निर्मणा करण्यासाठी तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रक्षोभक भाषणे करून शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे आमदार नितेश राणे, तेलंगणाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर सारख्या लोकांना सोलापूरात प्रवेश बंदी करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती, डीवायएफआय (डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया), कॉ. गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनिताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळ उपस्थित होते.