बार्शी : तालुक्यात पुन्हा गुरूवारी सायंकाळी पिंपळगाव (पा़) येथे झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसल्याने त्यात शेतकरी युवराज किसन भुसारे व अभिमान निवृत्ती कुंभार यांच्या शेतातील साडेतीन एकर केळीची बाग जमीनदोस्त झाल्याने सुमारे अडीच लाखांचे आर्थिक नुकसान झाले. या केळीच्या बागेबरोबरच शेतातील वस्त्या करून राहणार्या शेतकर्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. रोहिणी नक्षत्राचा शुभांरभ पाच दिवसांपूर्वी झाल्यानंतर २९ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक वादळीवार्यासह पाऊस जवळ जवळ ४० मिनिटे पडला. या पावसाने शेतकरी भुसारे यांच्या दीड एकर बागेतील केळीचे एक लाख २० हजार व कुंभार यांच्या दोन एकर केळीच्या बागेतील झाडे भुईसपाट होऊन एक लाख ३० हजार असे अडीच लाखांचे नुकसान झाले. या केळीच्या बागेतील पीक एक-दोन महिन्यात शेतकर्यांच्या हातात येण्याच्या मार्गावर असतानाच वादळी पावसाचा फटका बसला. शिवाय याचा फटका शेतात वस्ती केलेले महादेव कांबळे, धनाजी घोरपडे, दत्तात्रय जाधव, रामेश्वर पाटील, पांडुरंग यमगर, अशोक घोरपडे, श्रीमंत जाधव, धनाजी भंगुरे, लक्ष्मण जाधव यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले़ त्यामुळे येथील साहित्य भिजून नुकसान झाले आहे. या पावसाने नुकसान झाल्याचे समजताच या गावचे तलाठी दीपक खोटे यांनी तातडीने शुक्रवारी घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला़ -