सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या ७७५ कोटी रूपयांच्या थकबाकीसाठी संचालक, अधिकारी आणि कर्मचाºयांना जबाबदार ठरवून नोटीस बजाल्यानंतर हालचालींना गती आली असून, आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्या साखर कारखान्याकडील साडेबारा कोटी रूपयांची संपूर्ण रक्कम भरली आहे; तर दोन संस्था एकरमी परतफेड योजनेत (ओटीएस) सहभागी झाल्या आहेत. एक कारखाना रक्कम भरण्यास तयार आहे; पण काही संचालकांचा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा मनसूबा असल्याने वसुलीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेच्या चाचणी चाचणी लेखापरीक्षानंतर या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. थकबाकीची वसुली होत नसल्याने प्रशासक आले आहे.
मागील दोन-तीन वर्षे माळशिरस व बार्शीच्या संचालकांची थकबाकीसाठी नावे समोर आणली जात होती; मात्र अन्य तालुक्यातील बड्या संचालक नेत्यांकडेही थकबाकी असल्याचे चांगदेव पिंगळे यांनी केलेल्या चाचणी लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. जवळपास ५४ संस्थांकडे(साखर कारखाने, शिक्षण संस्था,कुक्कुटपालन) ७७५ कोटी रूपयांची थकबाकी असल्याने बँक अडचणीत आली आहे.वसुली होत नसल्याने मागील वर्षी बँकेचा एनपीए ३९ टक्क्यांवर गेला. त्यानंतर प्रशासकांची नियुक्ती झाली. प्रशासकांच्या प्रस्तावानुसार चाचणी लेखापरीक्षणासाठी फिरत्या पथकाचे प्रमुख चांगदेव पिंगळे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी करुन ३९ संचालक व ४२ बँक अधिकारी, कर्मचाºयांना नोटीस दिली होती.
६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या नोटीसवर १४ दिवसात म्हणणे देण्याची मुदत दिली होती. या मुदतीत संचालक व अधिकारी- कर्मचाºयांनी म्हणणे न देता चाचणी अहवालाच्या प्रतींची मागणी केली आहे. ५४ संस्थांना वाटप केलेल्या कर्जाची व थकबाकीची कागदपत्र देण्याची जबाबदारी बँकेवर असून आता यासाठी ७ व ८ मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
नोटीस मिळताच काही संचालकांची थकबाकी भरण्याची मानसिकता तयार झाली आहे. संचालक आमदार बबनराव शिंदे यांनी बबनराव शुगर, तुर्कपिंपरी या कारखान्याची साडेबारा कोटी रुपये इतकी थकबाकी भरली आहे.
‘ओटीएस’मध्ये जाण्यास तयार असलेल्या संस्थामंगळवेढा ड्रायफूड पशुखाद्य (कडबाकुट्टी) ची थकबाकी ५८ लाख रुपये असून एकरकमी परतफेड योजनेत(ओटीएस) सहभागी होण्यासाठी त्यांनी ५ टक्के रक्कम बँकेकडे भरली आहे. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडे ९ कोटी १५ लाख रुपये थकबाकी असून त्यांनी एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेत सहभागी होण्यासाठी ५टक्के रक्कम भरली आहे. पांडुरंग प्रतिष्ठानने ओटीएसमध्ये भाग घेण्यासाठी बँकेशी चर्चा केली आहे तर आदित्यराज शुगरही पैसे भरण्यास तयार आहे.
कागदपत्र मिळाल्यानंतर न्यायालयात दाद मागणार आहोत. चौकशीच्या नावाखाली आम्हाला अडचणीत आणण्याचा डाव भाजपा सरकारचा आहे. सहकारमंत्री सोलापूर बाजार समितीप्रमाणेच जिल्हा बँकेतही राजकारण करीत आहेत. संचालक मंडळ असताना थकबाकी वसुलीसाठी आम्ही प्रयत्न करीत होतो, प्रशासकाच्या कालावधीत वसुली ठप्प झाली. -राजन पाटील, माजी चेअरमन, जिल्हा बँक