सोलापूर : शेतकºयांबरोबरच बचत गटातील महिलांना कर्ज देण्यास बँकांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर व मंगळवेढा हे दोन तालुके वगळल्यास ९ तालुक्यात २७ टक्केच कर्ज वाटप झाल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण भागातील महिलांना स्वालंबी करण्यासाठी घरगुती छोटया मोठ्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटाची चळवळ उभी करण्यात आली आहे. जिल्हा विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात ७ हजार ९६0 महिला बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या बचत गटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पापड, शेवया,चटण्या, खाद्यपदार्थ, हाताने बनविण्यात येणाºया सुती, कापडी, लाकडी वस्तू, हातमागावर बनणाºया घोंगडी, शिवणकाम, विणकाम, सुतार, लोहारकामाला चालना देण्यासाठी कमी व्याजदारात राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी सर्व बँकांना उदिष्ठ दिले गेले आहे.
जिल्ह्याचे यंदाचे उदिष्ठ १३५ कोटी ९४ लाख इतके आहे. असे असताना केवळ २ हजार २२७ बचत गटांना ३७ कोटी २९ लाखाचे कर्जवाटप झाल्याची माहिती उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडीवाळी यांनी दिली. आणखी बचत गटांना कर्ज हवे आहे, पण बँकांकडून हात आखडता घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.
सीईओंनी बोलाविली बैठक
बचत गटांना कर्ज वितरणात येणाºया अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी ४ फेब्रुवारी रोजी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे. बचत गटांना जास्तीजास्त कर्ज वितरीत करण्यात यावे याबाबत हा पाठपुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.