मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील ८१ गावात १ हजार ५४१ अपात्र लाभार्थी आढळून आले होते .अपात्र असताना योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून त्या रक्कमेची वसुली करण्यात येत आहे दरम्यान आजपर्यंत तब्बल २५ लाख रुपये पर्यत रक्कम वसुली करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेक लाभार्थ्यानी स्वतःहुन तलाठयाकडे जाऊन व जाहीर केलेल्या स्टेट बँकेच्या खात्यात रक्कम भरली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात. ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी अपात्र असतानाही नोंदणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. तालुक्यात १ हजार ५४१अपात्र लाभार्थी आहेत. त्यांना हे पैसे भरण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये शासनाला परत करायचे पैसे भरले भरावे असे तहसीलदार स्वप्निल रावडे याच्याकडून आवाहन करण्यात आले होते.
या योजनेच्या निकषानुसार जर शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही. जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर तोही या योजनेसाठी अपात्र ठरणार. जर संबंधित शेतकरी करदाता असेल तर तोही यासाठी अपात्र ठरणार आहे. प्रत्यक्षात या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेकांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले होते.
तालुक्यातील ४० हजार ७१ लाभार्थ्यांमध्ये १ हजार ५४१ अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांत भरण्यात आलेल्या रक्कमेपैकी आजपर्यंत २५ लाख पर्यत रक्कम वसूल झाली आहे. कारवाई च्या भीतीपोटी स्वतः हुन मिळालेली रक्कम अपात्र लाभार्थी बँक खात्यात भरत आसल्याचे स्पष्ट झाले आहे.