सोलापूर : आपल्या मुलांसाठी आई-बाबा काहीही करु शकतात. त्यांना कमीत कमी त्रास व्हावा अशी त्यामागील भावना असते. निलेश पवार हे अशाच बाबांपैकी आहेत. आपल्या दिव्यांग मुलीला चालता येत नसल्याने ते अडीच महिने बाजारात फिरले. पण, हाती निराशा आल्याने त्यांनी आपल्या मुलीच्या गरजेचा विचार करुन स्वत:च वॉकर बनविला.
निलेश पवार यांनी तयार केलेल्या वॉकरला पिडियाट्रिक वॉकर असे म्हणतात. हा वॉकर साध्या वॉकरपेक्षा वेगळा असतो. ज्या मुलांना दिसत नाही व चालता येत नाही त्यांच्यासाठी बनवलेला. या पद्धतीच्या वॉकरसाठी फक्त सोलापूरच नव्हे तर पुणे-मुंबईमध्येही चौकशी केली पण असा वॉकर मिळालाच नाही. निलेश पवार यांची मुलगी नमस्या. तिला दिसत नसल्याने जमिनीचे अंतर, उंची याचा अंदाज येत नाही. तिचा स्वत: वर विश्वास नसल्याने ती चालू शकत नाही. यावर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्याने नमस्याने दोन वर्षापर्यंत काही व्यायाम केले, तसेच विशेष बूट वापरले.
शेवटी डॉक्टरांनी पिडियाट्रिक वॉकर घेण्याचा सल्ला दिला. वॉकर कसा असतो त्याचा एक फोटोही दाखवला. सोलापुरातील अनेक मेडिकल व सर्जिकलमध्ये वॉकरचा शोध घेतला. या प्रयत्नात खूप वेळ जात होता. त्यामुळे त्यांनी स्वत:च वॉकर बनविण्याचा विचार केला. यासाठी इंटरनेटचा आधार घेतला. कशा पद्धतीने वॉकर बनवता येईल यासाठी अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना निलेश पवार यांनी काही काळ फॅब्रिकेशनचे काम केले होते. त्याच्या अनुभवाचा वॉकर तयार करण्यासाठी फायदा झाला. सगळे साहित्य सोलापुरातच मिळाले. अभ्यासासाठी १५ दिवस आणि साहित्य एकत्र करायला एक आठ दिवस आणि वॉकर तयार करायला दोन दिवसांचा अवधी लागला.
चार हजार आठशे रुपये खर्च
ऑनलाईन वॉकर आठ हजाराला मिळतो. पण नमस्याच्या गरजेप्रमाणे तो नव्हता. त्याच्या गुणवत्तेबाबतत शंका होती. म्हणून त्यांनी हा वॉकर स्वत:च बनवण्याचा निर्धार केला. सुरुवातीला चारही चाके फिरणारा वॉकर बनवण्याचा विचार होता. पण, ती घाबरेल म्हणून मागे स्टॉपरचा पद्धतीचे चाक लावले. मागच्या चाकाला थांबवले तर वॉकर पुढे जाऊ नये याची काळजी घेतली. सगळे साहित्य नवीन घेतले. याला ४ हजार ८०० खर्च आला. नमस्या अशीच चालत राहिली तर भविष्यात तिला वॉकरची गरज पडणार नाही.
वैद्यकीय गुणवत्तेप्रमाणेच वॉकर बनवायचा होता. त्यामुळे सर्व साहित्य चांगलेच वापरले. वॉकरला एक पाईप दिला आहे. त्याचा तिला आधार मिळतो. वॉकर तयार करुन १३ दिवस झाले. ती आता भिंतीच्या आधाराने बाजूने चालत आहे. ते म्हणतात ना, मुलांच्या आनंदाशिवाय दुसरा आनंद नसतो , मला तोच आनंद तिच्या चालण्यातून मिळत आहे.
- निलेश पवार, नमस्याचे वडील