सोलापूर - केंद्र सरकारनं राबवलेल्या मोटार वाहन कायद्याची जेवढी खिल्ली उडवली जाते, तेवढाच धसकाही नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालनही काही सृजग नागरिकांकडून करण्यात येत आहे. कुठे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अमाफ दंड फाडण्यात आला आहे. तर, कुठे दंडापासून बचावासाठी भन्नाट आयडियाही वाहनचालक लढवताना दिसत आहेत. गणपती विसर्जनादिवशी चक्क गणपती बाप्पालाच सीटबेल्ट बांधून विसर्जनला नेण्याचं काम जागरुक पत्रकाराने केलं आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांसंबंधीच्या कायद्यातील बदल आणि नवीन नियमानुसार होणार दंड अतिशय चर्चेचा विषय बनला. याबाबत, पुणेरी पाट्याप्रमाणे जोक्सही व्हायरल झाले. तर, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊन दंड भरावा लागू नये, म्हणून नागरिकांनी हेल्मेट, सीटबेल्ट, लायसन्स आणि इतर नियमांचे प्रभावी पालन केल्याचेही पाहायला मिळाले. गणपती विसर्जनादिवशीही गणेशभक्तांमध्ये नवीन नियमाची धास्ती पाहायला मिळाली. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथील पत्रकार संजय बारबोले यांनी चक्क गणपती बाप्पालाही सीटबेल्ट बांधून विसर्जन करायला नेले. पत्रकार संजय बारबोले हे घरातील बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीतून निघाले होते.
बारबोले यांनी गणपती बाप्पांची पूजा-आरती केल्यानंतर गाडीच्या पुढील सीटवर बाप्पाला विराजमान केले होते. विशेष म्हणजे, पुढील सीटवर विराजमान केलेल्या बाप्पांना सीटबेल्ट बांधण्यात आला आहे. विसर्जनाच्या आनंदावर दंडाचं विरजन नको, जाता-जाता खिशाला झळ नको, म्हणून मी गणपती बाप्पाला सीटबेल्ट बांधला असून ड्रायव्हींग लायसन्स आणि इतर कागदपत्रांसहित नियमांचे पालन करत आहे, असे बारबोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच, लोकांनी नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन केल्यास पोलीस कुणाकडूनही दंड घेणार नाहीत. सरकारचा हा कायदा लोकहितासाठीच आहे, असेही बारबोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिल्याचं दिवाकर रावतेंनी जाहीर केलं आहे. या कायद्यासंदर्भात राज्यानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार तटस्थ आहे. यासंदर्भामध्ये आम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही, तोपर्यंत या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होणार नाही. तरीही अशा प्रकारे कोणी दंडवसुली करत असल्यास वाहन चालक कोर्टात जाऊ शकतात, असं रावतेंनी सांगितलं आहे.
सध्या महाराष्ट्रात जुन्या आरटीओ नियमाप्रमाणेच दंडवसुली केली जाणार आहे. राज्यात हा कायदा लागू करण्याबाबत सरकारनं तटस्थतेची भूमिका घेतली आहे. दंडाचा फेरविचार करण्यासाठी दिवाकर रावतेंनी नितीन गडकरींना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या मोटार वाहन कायद्याला राज्यात खो मिळाल्याची चर्चा आहे.