टेंभुर्णी : बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील उद्योजक दादासाहेब गणपत साळुंके (वय ३२) यांचा पुणे -सोलापूर महामार्गावरील पळसदेव हद्दीत खून करून मृतदेह उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाखाली टाकण्यात आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १२ आॅक्टोबरच्या सकाळी १०.३० वा. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर येथील भीमा नदीपात्रात पुलाखाली एका अनोळखी तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला होता. या तरुणाचा निर्घृण खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमागील कारणाचा शोध घेत जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, दादासाहेब साळुंके यांचा मिनरल वॉटरचा प्लॅन्ट आहे़ ते मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय करायचे़ त्यांनी गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास इंदापूर भिगवन दरम्यान महामार्गावर असलेल्या सूर्या हॉटेल येथे जेवण केले़ तेव्हा ते एकटेच होते, असे वेटरने सांगितले. जेवण करून ते त्यांच्या एम.एच. ४२/ ६४०० या स्विफ्ट कारने निघाले असता जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली होती़ ती व्यक्ती कारमध्ये बसली असेही वेटरने पोलिसांना सांगितले.
आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. आम्ही लवकरच खुन्यापर्यंत पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ अज्ञात आरोपींविरुद्ध ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़