सांगोला : माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हे बारामतीकरांचं पाप आहे, अशी टीका करीत माढ्यातून सर्वप्रथम निवडणूक लढविताना देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगोल्यात मावळत्या सूर्याची शपथ घेऊन येथील दुष्काळ हटविण्याचा निर्धार व्यक्त केला होता़ मात्र याच शरद पवार यांनी दुष्काळी भागातील पाणी अडवून ते बारामतीला पळविले, असा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
ज्या मतदारसंघात सेनापतीच निवडून येऊ शकत नाही, तेथे सैनिकाला बळीचा बकरा बनविण्यात आला, असे सांगून रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणपासून ते सांगोल्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघच दुष्काळी आहे. मात्र या दुष्काळी भागाकडे राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही पाणी प्रश्नावरच लढविली जाते. त्यामुळे या दुष्काळी मतदारसंघाचा पाणीप्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी म्हणून मी अपयशी ठरलो तर पुन्हा मते मागण्यासाठी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, नगराध्यक्ष राणी माने, तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे, मधुकर बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी राजश्री नागणे, श्रीकांत देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही मनोगतातून विरोधकांवर टीका केली़