ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - अगुस्ता वेस्टलॅन्ड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे, हे नक्की; पण दोन वर्षे मोदी सरकार काय करत होते. या घोटाळ्यावरून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करून नाहकपणे संसदेचा वेळ वाया घालवित आहेत. या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून त्याची दररोज सुनावणी करावी आणि दूरचित्रवाणीवरून ती प्रसारित करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए मुस्लमीनचे नेते खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी सोलापूर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते़.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ओवेसी येथे आले असून, सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अगुस्ता प्रकरणावरून जो गोंधळ सुरू आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. भविष्यात कोणतीही शस्त्रास्त्रे खरेदी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही. त्यामुळे शस्त्र खरेदी रखडली जाऊन सुरक्षा धोक्यात येईल. 'अगुस्ता' खरेदीमध्ये लाचखोरी झाली असताना मोदी सरकारने दोन वर्षे काय केले?, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपाने गंभीर झाले पाहिजे, असे आवाहन केले.
'एमआयएम'चे प्रस्थ वाढत असल्यामुळे भाजपाला फायदा होत असल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसला आता स्वत:ला सावरता येईना. हरियाणा, जम्मू - काश्मीर, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला. आता आमच्यावर हे आरोप करीत आहेत. मी आरोपांना सन्मान म्हणून स्वीकारतो. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले.
राज्यात पाचशे शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतानाही केंद्राकडून दुष्काळासाठी पुरेशी मदत आली नाही, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस आ. इम्तियाज जलील, पक्षाचे शहराध्यक्ष तौफिक शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षे मोदी सरकारने काय केले
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांना आव्हान देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहेत ;पण यावर आताच भाष्य नको 'दिल्ली अभी बहुत दूर है' असे विधान खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केले.