सोलापूर: रेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार असली तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम आहे. बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण? व जमिनीचा मोबदला कोणाला द्यायचा हा घोळ संपलेला नाही.
उजनी धरणाचे हिरज वितरिकेतून देगाव जलसेतू बांधून पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतीसाठी जाणार आहे. यासाठी देगाव जलसेतूचे काम २००४ पासून सुरू आहे. सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावरून देगाव बायपासजवळून हा देगाव जोडकालवा जातो. या जोडकालव्याची लांबी १८८६ मीटर इतकी आहे. यामधीलच रेल्वे रुळावरील ५५ मीटर व लगतच्या दोन्ही बाजूचे ४१ मीटर असे ९६ मीटर काम राहिले आहे. रेल्वे खात्याने काम करण्यास मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे पत्र दिले आहे. आता रेल्वे रुळावरील वितरिकेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जलसेतूचे काम संपल्यानंतर कालव्याचे ४०० मीटरचे गट नंबर १२५ व १२६ शेतजमिनीवरील काम राहिले आहे. १२५ गट नंबरवर सरपंच ग्रामपंचायत देगाव (केशव भानुदास सुपाते) असे नाव असून, या १३ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून लोक राहतात. हा परिसर हद्दवाढीत गेल्याने आता महानगरपालिकेचा ताबा आहे. ग्रामपंचायतही बरखास्त झाल्याने दप्तर महानगरपालिकेकडे आहे. उताºयावर ग्रामपंचायतीचे नाव व दप्तर महानगरपालिकेकडे असल्याने कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करीत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकारी व आयुक्तांसोबत चर्चाही झाली आहे.
मात्र मार्ग निघाला नाही. ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या उताºयावरील अतिक्रमण कोणी काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, मोबदला कोणाला द्यायचा?, हाही प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे जलसेतूचे काम पूर्ण झाले तरी १३ गुंठे क्षेत्राचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याला जाणार नाही. विशेष म्हणजे कालव्याचे पुढचे कामही बºयापैकी झाले आहे.
जागा हस्तांतराचा झेडपी-मनपात वादच्हद्दवाढीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावे सोलापूर शहरात सामावली आहेत. ११ ग्रामपंचायती मनपात गेल्याने या गावातील आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत गावठाण तसेच अन्य शासकीय जागा हद्दवाढीत गेल्या. या जागा मनपाला हस्तांतरण करून देण्याचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. अशाच पद्धतीने देगावची १२५ गट नंबरचीजमीनही हस्तांतरण होऊन मनपाचे नाव नोंदणे आवश्यक आहे. च्जलसेतूचे काम झाल्यानंतर कालव्याद्वारे उत्तर तालुक्यातील २७९९ हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ३८०० हेक्टर व अक्कलकोट तालुक्यातील ९००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.