यावेळी संचालक रावसाहेब मनगिरे, चंद्रकांत मांजरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिजित गाढवे उपस्थित होते. शहर व तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.
तसेच शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी बार्शीत येत आहेत, तसेच शहरात व ग्रामीण भागात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे व इंजेक्शन इत्यादी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत राज्य शासनाच्या
आवाहनानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रुग्णांना तातडीने उपचार मिळावा या उद्देशाने व आवश्यक त्या सोयी मोफत उपलब्ध
करून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.
बार्शी बाजार समितीचे फळे, भाजीपाला दहा हजार चौरस फुटाचा हॉल आहे. त्या ठिकाणी १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याची क्षमता असल्याने या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करता येईल. या पार्श्वभूमीवर ३० एप्रिल रोजी संचालक मंडळाची तातडीची सभा बोलाविलेली आहे. सभेमध्ये कोविड सेंटर उभारणीच्या विषयास मंजुरी घेऊन याच्या खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सह संस्था, सोलापूर यांच्यामार्फत पणन संचालक पुणे व महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरीनंतर कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी दिली.
बाजार समितीला चार कोटींचा निधी
बाजार समितीला चार कोटींचा वाढावा झाला आहे. त्यातील १० टक्के रक्कम खर्च करण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. रक्कम कमी पडल्यास शासनाची मंजुरी घेऊन आमच्या १२ कोटींच्या ठेवी आहेत, त्यातून ही खर्च करण्यात येईल. या कोविड सेंटरसाठी ५ डॉक्टर आणि २० नर्सिंग स्टाफही मानधनावर भरण्यात येणार आहे.
केमिस्ट असोसिएशन औषधे देणार
बाजार समितीमधील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना बार्शी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘ना नफा ना तोटा तत्त्वावर’ माफक दरात औषधे देणार असल्याचे केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी जाहीर केले.