बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तुरीची विक्रीसाठी आवक झाली आहे. तुरीला ५७०० ते ६१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शुक्रवारी बाजारात ३०० कट्टे तुरीची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली. येत्या १५ दिवसांत आवक आणखी वाढेल अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भुसार मालाची उतारपेठ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा बाजारात उडीद, सोयाबीनची विक्रमी आवक झाली. दोन दिवसापासून तुरीची आवकही सुरू झाली आहे़. सध्या बाजारात ज्वारीची हजार कट्टे आवक असून, दर १५०० ते ४९०० रुपये मिळत आहे. सोयाबीनची आवक पाच हजार कट्टे आहे. याला दर ००० ते ४०५० रुपये मिळत आहे. हरभऱ्याची ७०० कट्टे आवक असून, दर ३,५०० ते ४,१०० दिला गेला. मक्याची आवक ५०० कट्टे झाली असून, दर ११०० ते १४५० रुपये दिला गेला. उडदाची आवक ४०० कट्टे आणि दर ३००० ते ७००० रुपये दिला गेला आहे.
तुरीची काढणीला आता सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवसांत आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज जगदाळे यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, अॅड. सागर रोडे, व्यापारी नागजी राऊत उपस्थित होते.
--
वजन होताच पट्टी हातात
बार्शीच्या बाजारात तूर, उडीद, सोयाबीन, हरभरा,ज्वारी या शेतमालांचे मोठे खरेदीदार आहेत. तसेच शेतकऱ्यांना पट्टीदेखील वजन होताच दिली जाते. त्यामुळे याठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात आहे. बार्शीत दिलीप खटोड, मैनुद्दीन तांबोळी, कादर तांबोळी, दिलीप गांधी, सोमाणी बंधू या उद्योजकांचे तूरडाळीचे २० कारखाने आहेत. त्यामुळे याठिकाणी तुरीला मागणीदेखील जास्त आहे.