बार्शी : शहरात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातून चार लाख ७५ हजारांच्या रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिने पळवल्याची घटना घडली.
२२ फेब्रुवारी रोजी दुपारी चोरीचा हा प्रकार घडला असून या घटनेने उपळाई रोडवर खळबळ उडाली. याबाबत श्रीकांत पंडित कुलकर्णी ( ६०, रा. उपळाई रोड, चव्हाण प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी कपाटातून दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या , तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्यांचे मीनी गंठन, सोन्याच्या रिंगा, नथ व टॉप्स, चांदीचे दागिने असा चार लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार श्रीकांत कुलकर्णी हे सोमवारी घराला कुलूप लावून नियमती आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते. सायंकाळी परत येताच घराच्या मुख्य बंद दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. या दाम्पत्याने घरात डोकावताच लोखंडी कपाट उचकटलेले दिसले. आता येऊन पाहणी करताच पावणेपाच लाखांचे दागिने आणि रोकड पळविल्याचे निदर्शनास आले.
---
श्वान धावले किलोमीटरपर्यंत
घटना समजताच बार्शी शहर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सोलापूरहून श्वानपथक व ठसेतज्ज्ञाला पाचारण केले. श्वान १ किलो मीटर अंतरावर जाऊन घुटमळले. रात्री उशिरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास फौजदार प्रेमकुमार केदार करत आहेत.