भ. के. गव्हाणे/ शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: बार्शी विधानसभेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र्र राऊत यांनी ९५,४८२ मते घेत त्यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल (९२,४०६) यांचा ३,०७६ मतांनी पराभव करुन १० वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आमदारकी आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांना १६ हजार ११९ तर अपक्ष विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला ११ हजार ४२७ मते मिळाली. राऊत यांचे चिन्ह व रोडरोलर या चिन्हांमध्ये साधर्म्य असल्यामुळे राऊत यांचा कमी मतांनी विजय झाला. फेरीनिहाय उत्कंठा वाढत होती. अखेर विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला.
उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामात सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार, अभय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. एका बाजूला पोस्टल व सैनिक मतांची मतमोजणी सुरु होती तर दुसरीकडे १४ टेबलांवर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीत उत्तर बार्शी भागातील उपळाई जिल्हा परिषद गटातील गावांचा समावेश असलेल्या भागातून ३६८ मतांची आघाडी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली. ही आघाडी सहाव्या फेरीपर्यंत हळूहळू वाढत जाऊन ती ४,७१० मतांपर्यंत पोहोचली होती.
सातव्या फेरीला बार्शी शहरातील मतमोजणीला सुरुवात झाली. यात १,५५२ मते शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी जास्त घेतल्याने राऊत यांची आघाडी हळूहळू कमी होऊ लागली. संपूर्ण शहराची मतमोजणी होईपर्यंत राऊत यांची आघाडी कमी करुन दिलीप सोपल दहाव्या फेरीअखेर ४,८६९ मतांनी राऊत यांच्यापेक्षा पुढे गेले.
मात्र पुन्हा अकराव्या फेरीपासून राऊत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. अकराव्या फेरीत ५३२ मतांची आघाडी घेऊन सोपल यांचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले. यानंतर राऊत यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक फेरीगणिक राऊत यांना ३०० ते ५०० मतांची आघाडी मिळत गेली. मात्र या जोडीला अपक्ष उमेदवार कळसकर यांच्या रोडरोलरलाही प्रत्येक फेरीला ५00 मते मिळू लागल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढू लागली होती. मतमोजणी प्रतिनिधींनाही घाम फुटू लागला. १७ व्या फेरीत राऊत यांनी वैराग भागातील उपळे दुमाला गणात समावेश असलेल्या गावांतून चांगले मताधिक्य मिळाल्याने तब्बल १२६४ मतांची आघाडी घेतली तर १८ व्या फेरीपासून सोपल यांचे मताधिक्य कमी करत त्यांच्यापेक्षा ७९८ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या २४ व्या फेरीपर्यंत हळूहळू वाढतच गेली व २४ व्या फेरीअखेर राजेंद्र राऊत हे ९३ हजार ९६१ मते घेऊन सोपल (९१ हजार ३१६) यांच्यापेक्षा २,६४५ मतांनी पुढे असल्याचे निश्चित झाले व मतमोजणी केंद्रात असलेल्या राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदात उड्या मारण्यास सुरुवात केली. बाहेरही कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. सोपल गटाच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. सायंकाळपर्यंत पोस्ट मतांची मोजणी सुरु असल्याने विजयाचा नेमका आकडा समजू शकला नाही. तरीदेखील पोस्टल मतांमध्येही राऊत यांनी आघाडी घेतल्याचे वृत्त आहे.
...म्हणून राऊतांचे मताधिक्य घटले- राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांना १५ हजार ९१५ मते मिळाली तर राजेंद्र राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाला साधर्म्य असलेल्या विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला ११ हजार ४२७ मते पडली. या दोघांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांकही एकाखाली एक असल्याने राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाकडे जाणारी मते रोडरोलरला पडल्याने राऊत यांचे अधिकृत मताधिक्य कमी झाले. अन्यथा राऊत यांचा विजय हा १४ हजार मतांनी झाला असेच म्हणावे लागेल.
सोपल वगळता सर्वांची अनामत जप्त- पोस्टल मतांमध्ये दिलीप सोपल यांना १,०९० मते, निरंजन भूमकर यांना २०४ तर राजेंद्र राऊत यांना १,५२१ मते मिळाली. म्हणजे पोस्टल मतांमध्ये राऊत यांनी ४३१ मतांची आघाडी घेतली. दिलीप सोपल वगळता उर्वरित सर्व १२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.
क्षणचित्रे
- - मतमोजणी सुरु झाल्यापासून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. याशिवाय बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, अभिजित राऊत, विजय राऊत हे राऊत परिवारातील सदस्य मोजणी केंद्रात आकडेवारी घेण्यात व्यस्त होते.
- - मागील दोन विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांना तिसºया उमेदवाराचा फायदा झाल्याने विजय सोपस्कर केला होता. यावेळी मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा उमेदवार अडचणीचा ठरला व त्यांना ३ हजार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
- - विजय निश्चित झाल्यानंतर राजेंद्र राऊत तत्काळ भोजन कक्षात जाऊन पोटाला आधार देत थोडेसे खाल्ले.
बार्शीकर जनतेने मला विजयी केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या विरोधकांनी कुटील कारस्थाने करुन आमच्या चिन्हासारखे चिन्ह घेऊन रडीचा डाव खेळला. मात्र तो यशस्वी झाला नाही. यापुढे बार्शी तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. आम्ही आयुष्यभर जनतेची सेवा करणार असून, जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु. तसेच शहराचाही विकास करण्यास कटिबद्ध आहे. शेतकºयांची मान कधी खाली जाऊ दिली जाणार नाही. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना पाणी देऊन तालुका पाणीदार करु व यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करु.- राजेंद्र राऊत, विजयी उमेदवार