बार्शी : रविवारी पहाटे २ वाजून ५२ मिनिटांनी माऊली ट्रेडर्सच्या शटरचे कुलूप तोडले... आतील कॅशबॉक्समधील ८ लाख ४६ हजारांची रोकड पळवली. अवघ्या ११ मिनिटात चोरी करणारे तिघे चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचतील का ? हा खरा प्रश्न आहे.
संतोष प्रभाकर शिराळ (रा. आडवा रोड, बार्शी) यांचे रोडगा रस्त्यावरील बाजारपेठेत माऊली ट्रेडर्स हे फर्निचरचे दुकान आहे. बुधवारी लक्ष्मीपूजन, गुरुवारी पाडवा आणि शुक्रवारी भाऊबीज या तीन दिवशी दुकानात मोठ्या प्रमाणात फर्निचरची विक्री झाली होती. शनिवारी बँका बंद असल्याने तीन दिवसांमध्ये झालेल्या विक्रीची रक्कम कॅशबॉक्समध्येच होती. ही रक्कम घरी नेण्याऐवजी सोमवारी बँकेत भरण्याचा विचार करुन संतोष शिराळ हे शनिवारी दुकान बंद करून घरी गेले. कदाचित ही संधी साधून रविवारी पहाटे चोरट्यांनी हे दुकान फोडले. दुकानाचे शटर उचकटून आत जाणे, आतील टेबलमधील कॅश चोरणे यासाठी चोरट्यांना केवळ ११ मिनिटाचाच अवधी लागला. यावरुन चोरटे अगदी तरबेज असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आज (रविवारी) एक महिलेस दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसले. तिने शिराळ यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिराळ हे तातडीने दुकानी आले. त्यांनी बार्शी शहर पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सपोनि पंढरीनाथ बोधनापोड, दिगंबर गायकवाड आदी घटनास्थळी आले. पाठोपाठ कायरा नावाच्या श्वानपथकातील सपोनि माने, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. गणगे, एस. एस. दोरनाल हेही दाखल झाले. श्वान पथकातील कायराला वास दाखविण्यात आला; मात्र हा श्वान टिळक चौकापर्यंत गेला आणि तेथेच घुटमळत राहिला. संतोष शिराळ यांनी रीतसर फिर्याद दिली असून, तपास सपोनि पंढरीनाथ बोधनापोड करत आहेत.
तोंडाला फडके बांधून साधला डाव !- माऊली ट्रेडर्स हेच दुकान फोडण्याचा डाव चोरट्यांनी आखला. कुणाला कळू नये यासाठी तिघे चोरटे तोंडाला फडके बांधून दुकानासमोर आले. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असले तरी चोरट्यांचा शोध घेताना पोलिसांना आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.