बार्शी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे ही दिलासादायक बाब असली तरी तालुक्यात मात्र रुग्णसंख्या कमी होण्यास तयार नाही. चाचण्यांचे प्रमाणही कमीजास्त असले तरी रुग्णसंख्येची स्थिरावलेली संख्या हा चिंतेचा विषय आहे. सोबतच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.
शनिवार ते मंगळवार या चार दिवसात ४१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर दुसरीकडे बारा जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २९९ रुग्णांमध्ये बार्शी शहरात ६९, तर ग्रामीण भागातील १२२ रुग्ण आहेत. अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. चार दिवसात २७३४ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.
शहरात १४८६, तर ग्रामीण भागात १२४८ जणांच्या चाचण्या झाल्या. बार्शीत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एचआरसीटी स्कोअर जास्त आढळून येत आहे. खेड्यातील नागरिक आजार अंगावर काढत असल्याने व उशिरा दवाखान्यात येत असल्याने ऑक्सिजनची गरज पडत आहे. सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर सुरू झाल्याने रुग्णांची गावोगावी सोय झाली आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि हेल्थ केअर सेंटरची संख्या वाढल्याने रुग्णांना बेड मिळण्यासही अडचणी कमी झाल्या आहेत.