नुकतेच माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून मिल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाचे लक्ष वेधले. आता तरी ही मिल सुरू व्हावी, अशी या कामगारांची अपेक्षा आहे. सोलापूर प्रमाणेच गिरणगाव म्हणून शतकभरापूर्वी ओळख असणाऱ्या बार्शीतील राजन मिल व लोकमान्य मिल या सूतगिरण्या काळाच्या ओघात बंद पडल्या. काकासाहेब झाडबुके यांनी स्थापन केलेल्या जयशंकर मिलचे १९७४ साली राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे हस्तांतरण झाले. आज राज्यामध्ये सूत निर्मिती करणाऱ्या पाच सूतगिरण्यामध्ये बार्शीची मिल अग्रेसर आहे. या मिलमध्ये १७५ कायम असलेले ६० बदली असणारे १३५ कंत्राटी असे कामगार काम करतात.
केंद्र सरकारने टाळेबंदी घोषित केल्यानंतर बार्शी टेक्सटाईल् मिलदेखील बंद करण्यात आली. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या २३ दिवसाच्या हजेरी पटावरील कार्यकाळाचे निकष लावून कायम कामगारांना त्यापैकी निम्मे वेतन दिले जाते. हे वेतन अत्यंत तुटपुंजे असून कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे संकट आहे. मिळेल ते काम करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, खासदार ओमराजे निंबाळकर व अन्य नेते तसेच इंटक व अन्य कामगार संघटनाही अनलॉक झाल्यानंतर मिल सुरू करण्याबाबत सातत्याने लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापही या गिरणीचा भोंगा वाजण्यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रलंबित निर्णयामुळे आज तरी कामगार हवालदिल झाले आहेत.
नेत्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी
या मिलमध्ये आम्हाला कामगार म्हणून उपजीविकेचे सुरक्षित साधन होते. गेली ११ महिने मिल बंद असल्यामुळे आम्हाला अगदी अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. मिल सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत व केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मनिषा देवरे, नंदा कुलकर्णी, शीला लंकेश्वर, लक्ष्मी मोहिते यांनी केली आहे.
कोट :::::::::::
बार्शी टेक्साईल मिल सुरु होण्यावर ४०० कामगारांचे संसार अवलंबून आहेत. अचलपूर व दादर येथील सूत गिरण्या सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने ही तत्परता दाखविली. त्याच पद्धतीने बार्शीतील मिल सुरू करण्याबाबतही तातडीने निर्णय होण्याची गरज आहे.
- नागनाथ सोनवणे,
इंटक नेते