सोलापूर : बार्शी व उत्तर सोलापूर हे दोन्ही तालुके टंचाईस्थितीतून तांत्रिकदृष्ट्या वगळले असले तरी कृषी विभागाने स्वतंत्र पथक पाठवून तेथे पुन्हा एकदा पाहणी करावी, अशी आग्रही भूमिका राज्यस्तरीय दुष्काळ समितीच्या बैठकीत मांडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरूवारी दिली. त्यामुळे आता या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळासंबंधीचा निर्णय राज्यस्तरीय दुष्काळ समितीचे अध्यक्ष तथा कृषी आयुक्त यांच्या हाती आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या टंचाई अहवालावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील सत्यस्थिती मांडल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. इतर तालुक्यांप्रमाणेच उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. या दोन तालुक्यांतही पावसाअभावी ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
यंदा जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाचीही आता आशा मावळली आहे. भविष्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेला अहवाल विभागीय आयुक्त व कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात उपग्रह सर्वेक्षणात पात्र ठरलेले अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ या ९ तालुक्यांबरोबरच वगळण्यात आलेल्या उत्तर सोलापूर आणि बार्शी या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला आहे.
यापूर्वी शासनाच्या जीपीएस सिस्टिमद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत उत्तर सोेलापूर आणि बार्शी तालुक्यात हिरवे क्षेत्र दिसत असल्याने या दोन्ही तालुक्यांना टंचाई स्थितीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या भागातील क्षेत्र हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात पिके हाती लागणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही तालुके वगळले असले तरी कृषी विभागाने पुन्हा एकदा पथक पाठवून उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्याची पाहणी करुन अंतिम निर्णय घ्यावा, अशी समितीपुढे मागणी केल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. त्यामुळे आता कृषी आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, यावर या दोन्ही तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
चाºयासाठी ३५ लाखच्जिल्ह्यातील संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेता नियोजन समितीतून चाºयासाठी ५0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातील ३५ लाख पशुसंवर्धन विभागाला वितरित केले आहेत. यातून आत्मा संस्थेमार्फत १५०० एकरांवर सुमारे ५० हजार टन चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून आठवडाभरात लाभार्थ्यांना बी-बियाणे व खते उपलब्ध करून दिली जातील. सध्या १४ लाख टन चारा उपलब्ध असून, तो मार्चपर्यंत पुरणार आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल, हे लक्षात घेऊन १५ हजार जलसाठे आरक्षित करण्याबाबत संंबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. मागणी असेल तेथे टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना दिल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले.